Deepti Sharma DSP : भारतीय महिला क्रिकेट संघात आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे नेहमी चर्चेत असणारी दीप्ती शर्मा सध्या यशाच्या शिखरावर आहे. नुकत्याच पार पडलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत दीप्तीने 22 विकेट्स घेत सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होण्याचा मान मिळवला.
विशेष म्हणजे, अंतिम सामन्यात तिने 5 विकेट्स मिळवल्या आणि फलंदाजीतही अर्धशतक झळकावून आपली क्षमता सिद्ध केली. या स्पर्धेतील तिच्या कामगिरीसाठी तिला मालिकावीर पुरस्कारनेही सन्मानित करण्यात आले.
या क्रिकेटमधील यशासोबतच, ती आता उत्तर प्रदेश (UP) पोलीस दलात उपअधीक्षक (DSP) म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे.
क्रिकेटच्या यशाचा पाया
दीप्ती शर्माचा जन्म 24 ऑगस्ट 1997 रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला. तिच्या आई-वडिलांना तिला क्रिकेटपटू बनवण्यात मोलाची भूमिका बजावली. केवळ 8 वर्षांची असताना ती तिचा भाऊ सुमित शर्मासोबत सरावाला जायची.
तिचा प्रभावी थ्रो पाहून माजी भारतीय फलंदाज हेमलता काला यांनी तिचे टॅलेंट ओळखले. सुरुवातीला वेगवान गोलंदाजी करणारी दीप्ती, भाऊ सुमितच्या सल्ल्याने फिरकीपटू बनली, जेणेकरून तिला दुखापतीचा धोका कमी होईल आणि ती प्रभावी ऑलराउंडर म्हणून खेळू शकेल. सुमितने तर एमबीएची नोकरी सोडून 2 वर्षे तिला मार्गदर्शन केले. यामुळे 12 व्या वर्षी तिची निवड उत्तर प्रदेश अंडर-19 संघात झाली.
विक्रमांचे शिखर आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण
दीप्तीने वयाच्या 17 व्या वर्षी 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने 2017 मध्ये पूनम राऊतसोबत आयर्लंडविरुद्ध 320 धावांची विक्रमी सलामीची भागीदारी रचली, जो महिला वनडेतील विश्वविक्रम आहे. त्या सामन्यातील तिची 188 धावांची वैयक्तिक खेळी खूप गाजली.
दीप्ती 20 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. याशिवाय, WPL 2023 मध्ये हॅटट्रिक घेण्याचा मान मिळवणारी ती पहिली भारतीय गोलंदाज बनली. तिची सातत्यपूर्ण कामगिरी 2024 च्या टी 20 मालिकेत 30 विकेट्स आणि आता वर्ल्ड कप 2025 मध्ये 22 विकेट्सने सिद्ध झाली आहे.
DSP पदापर्यंतचा सन्मान
दीप्तीला 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2023 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर, उत्तर प्रदेश सरकारने जानेवारी 2024 मध्ये तिला 3 कोटी रुपये आणि थेट DSP (उपअधीक्षक) पदाची घोषणा केली होती. 2025 मध्ये मुरादाबाद येथील एका कार्यक्रमात तिला पोलीस दलाची वर्दी प्रदान करण्यात आली.
रिपोर्टनुसार, एका डीएसपीला यूपी पोलीसमध्ये मूळ वेतन आणि भत्ते मिळून सुमारे 80,000 ते 1 लाख रुपये मासिक वेतन मिळते. 230 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली दीप्ती, क्रिकेटच्या मैदानासोबतच आता पोलीस दलातही आपला ठसा उमटवत आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








