England T20 Records: इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दमदार कामगिरी करत अनेक विक्रम मोडले आहेत. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने 20 षटकांत तब्बल 304 धावा करत क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली.
इंग्लंड हा टी20 मध्ये 300 धावांचा टप्पा गाठणारा पहिला पूर्णवेळ देश (full member nation) आहे. बटलर आणि फिल सॉल्ट यांच्या वादळी फलंदाजीमुळे इंग्लंडने 146 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 2 विकेट्स गमावत 304 धावांचा डोंगर उभा केला. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त 156 धावा करू शकला.
🚨 HISTORY CREATED BY ENGLAND. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2025
– England becomes the first team to score 300 runs in a T20i against a full member nation. 🤯 pic.twitter.com/Gzhb7hrEGA
England T20 Records: टी-20 मध्ये धावांचा महापूर
या सामन्यात इंग्लंड संघाने अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले:
- विश्वविक्रमी धावसंख्या: कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये 304/2 ही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. 2024 मध्ये भारताने बांगलादेशविरुद्ध केलेल्या 297/6 धावांचा विक्रम इंग्लंडने मोडला.
- सर्वात वेगवान 200 धावा: इंग्लंडने अवघ्या 12.1 षटकांत 200 धावा पूर्ण केल्या. कसोटी खेळणाऱ्या संघांमध्ये हा सर्वात वेगवान विक्रम आहे.
- पॉवरप्लेमध्ये धडाकेबाज सुरुवात: पहिल्या सहा षटकांत इंग्लंडने 100/0 धावा करत आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा पॉवरप्ले स्कोर नोंदवला.
- बटलर-सॉल्टची ऐतिहासिक भागीदारी: जोस बटलर आणि फिल सॉल्ट हे दोघेही 20 पेक्षा कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारे कसोटी खेळणाऱ्या देशांचे पहिले सलामीवीर ठरले.
फिल सॉल्टने रचला इतिहास
फिल सॉल्ट या सामन्याचा खरा हिरो ठरला. त्याने अवघ्या 39 चेंडूंमध्ये वेगवान शतक ठोकले, जो एखाद्या इंग्लिश खेळाडूचा टी-20 मधील सर्वात जलद शतक आहे. यापूर्वी लियाम लिव्हिंग्स्टोनच्या नावावर असलेला 42 चेंडूंतील शतकाचा विक्रम त्याने मोडला.
सॉल्टने 141 धावांची खेळी करून इंग्लंडसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही आपल्या नावावर केला.
इंग्लंडने 146 धावांनी विजय मिळवून टी-20 क्रिकेटमधील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. हा कसोटी खेळणाऱ्या संघांमधील तिसरा सर्वात मोठा विजय आहे.
हे देखील वाचा – गावागावात आता 4G नेटवर्क; BSNL साठी 930 गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी