Finn Allen : IPL मध्ये अनसोल्ड, पण आता केला मोठा विक्रम! ‘या’ क्रिकेटपटूने अवघ्या 51 चेंडूत केल्या 151 धावा

Finn Allen

Finn Allen Record| अवघ्या काही महिन्यांपूर्वी आयपीएलमध्ये खेळण्याची संधी न मिळालेल्या न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज फिन ॲलनने मेजर लीग क्रिकेट 2025 (MLC 2025) च्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचला. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्नसकडून खेळताना ॲलनने वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध अवघ्या 51 चेंडूत 151 धावांची वादळी खेळी केली.

151 धावांची खेळी करताना त्याने 5 चौकार आणि तब्बल 19 षटकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट 296 पेक्षा अधिक होता, ज्याने वॉशिंग्टन फ्रीडमच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. या खेळीमुळे MLC 2025 ला धमाकेदार सुरुवात झाली असून, ॲलनने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने अवघ्या 49 चेंडूतच 150 धावांचा आकडा गाठत विक्रम केला.

विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या आयपीएल 2025 च्या लिलावात फिन ॲलनला कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी केले नव्हते.

विक्रमांची मालिका

ॲलनने या खेळीत अनेक विक्रम मोडले. त्याने 49 चेंडूत T20 क्रिकेटमधील सर्वात जलद 150 धावा पूर्ण केल्या. तसेच, 34 चेंडूत शतक झळकावत न्यूझीलंडकडून T20 मधील सर्वात जलद शतक आणि MLC इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम नोंदवला. याशिवाय, त्याने ख्रिस गेल आणि इस्टोनियाच्या साहिल चौहान यांचा T20 डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला. गेल आणि चौहान यांनी प्रत्येकी 18 षटकार मारले होते, तर ॲलनने 19 षटकार ठोकले.

ॲलनच्या 151 धावांपैकी 134 धावा केवळ चौकार आणि षटकारांमधून आल्या, ज्यात 19 षटकारांमधील 114 धावांचा समावेश आहे. T20 क्रिकेटच्या इतिहासात बाउंड्रीमधून एवढ्या धावा फक्त तीन फलंदाजांनीच केल्या आहेत. ॲलनच्या या विक्रमी खेळीने MLC 2025 ची लोकप्रियता वाढवली आहे.