Harbhajan Singh on Rohit Sharma ODI Captaincy: BCCI ने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी या सीरिजसाठी रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्याची घोषणा केली. या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
रोहितच्या जागी आता युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून, 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या (ODIs) मालिकेत तो संघाची धुरा सांभाळेल.
बीसीसीआयच्या निर्णयावर हरभजन सिंगला धक्का
बीसीसीआयच्या या निर्णयावर माजी भारतीय खेळाडू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) आश्चर्य व्यक्त केले आहे. शुभमन गिलच्या बढतीबद्दल आनंद व्यक्त करतानाच इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कर्णधार म्हणून शेवटची संधी द्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले.
हरभजन सिंग काय म्हणाला?
निवड समितीच्या निर्णयावर बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, “रोहितला कर्णधार नसताना पाहणं माझ्यासाठी थोडं धक्कादायक आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये रोहितचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. तो संघात असताना त्याला कर्णधारपदावरून हटवणं आश्चर्यकारक आहे.”
“त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इतर स्पर्धाही जिंकल्या आहेत. जर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आहे, तर त्यालाच कर्णधार म्हणून करण्याची संधी द्यायला हवी होती. मला माहित आहे की 2027 चा विश्वचषक अजून लांब आहे. गिलला अजून सहा ते आठ महिने किंवा एक वर्षाचा अवधी घेता आला असता. त्यामुळे, मी शुभमनसाठी आनंदी आहे, पण रोहितला हटवल्याने निराश आहे.”
दरम्यान, बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होईल.
हे देखील वाचा – Maharashtra News: महाराष्ट्रातील हॉटेल्स-रेस्टॉरंट्स आता 24 तास खुली राहणार; मात्र ‘या’ गोष्टींना परवानगी नाही