Abhishek Sharma Breaks Yuvraj Singh Record : सलामीवीर अभिषेक शर्माच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर 48 धावांनी विजय मिळवला.
अभिषेकने केवळ 35 चेंडूत 84 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 5 चौकार आणि 8 गगनभेदी षटकारांचा समावेश होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 238 धावांचा डोंगर उभा केला होता, ज्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 7 बाद 190 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
अभिषेकने मोडला मेंटॉर युवराजचा विक्रम
या खेळीदरम्यान अभिषेक शर्माने भारताचा दिग्गज फलंदाज युवराज सिंगचा एक मोठा विक्रम मोडीत काढला. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेकने आता युवराजला मागे टाकले आहे. युवराज सिंगने 51 डावात 74 षटकार मारले होते, तर अभिषेकने अवघ्या 33 डावात 81 षटकारांचा टप्पा गाठला आहे.
भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:
- रोहित शर्मा: 205
- सूर्यकुमार यादव: 156
- विराट कोहली: 124
- हार्दिक पंड्या: 106
- केएल राहुल: 99
- अभिषेक शर्मा: 81
रिंकू आणि सूर्याची साथ
दरम्यान, सामन्यात अभिषेकच्या झंझावातानंतर रिंकू सिंगने अखेरच्या षटकांत 20 चेंडूत नाबाद 44 धावा कुटल्या. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनीही उपयुक्त योगदान दिल्याने भारताने मोठी धावसंख्या उभारली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 40 चेंडूत 78 धावांची झुंजार खेळी केली, मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. मार्क चॅपमनने 39 धावांचे योगदान दिले.
वर्ल्ड कप 2026 साठी सज्ज
2026 चा टी20 वर्ल्ड कप जवळ येत असताना अभिषेक शर्माचा हा फॉर्म भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या गुरुचा म्हणजे युवराज सिंगचा विक्रम अवघ्या काही सामन्यांत मोडणाऱ्या अभिषेककडून आता आगामी सामन्यांतही अशाच स्फोटक सुरुवातीची अपेक्षा आहे. सातत्य राखल्यास तो लवकरच केएल राहुलचा विक्रमही मोडू शकतो.









