India Under 19 World Cup Win: झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताच्या युवा ब्रिगेडने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करत आयसीसी १९ वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. या विजयासह भारताने विक्रमी सहाव्यांदा या चषकावर आपले नाव कोरून जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
वैभव सूर्यवंशीचे ऐतिहासिक शतक
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने मैदानात धावांचा पाऊस पाडला. त्याने १७५ धावांची जबरदस्त खेळी केली, जी १९ वर्षांखालील विश्वचषक फायनलच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. कर्णधार आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ५३ धावा करत वैभवला चांगली साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे भारताने अवघ्या १३.२ षटकात १०० धावा पूर्ण केल्या होत्या.
धावांचा डोंगर आणि इंग्लंडचा लढा
भारताच्या मधल्या फळीतील वेदान्त त्रिवेदी (३२), विहान मल्होत्रा (३०) आणि अभिज्ञान कुंडू (४०) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अखेरच्या षटकांत कनिष्क चौहानने २० चेंडूत नाबाद ३७ धावा कुटल्या, ज्यामुळे भारताने ४० षटकात ४११ धावांचे महाकाय आव्हान इंग्लंडसमोर ठेवले.
इंग्लंडचा डाव १० मिनीटांत कोसळला
४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. बेन मेस (४५) आणि बेन डॉकिन्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज एकापाठोपाठ बाद झाल्याने इंग्लंडचा डाव विस्कळीत झाला. १७४ वर ३ बाद अशा सुस्थितीतून इंग्लंडची अवस्था १७७ वर ७ बाद अशी झाली. कॅलेब फॅल्कनरने एकाकी झुंज देत ६७ चेंडूत ११५ धावांचे शानदार शतक ठोकले, परंतु त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही.
भारताची भेदक गोलंदाजी
भारताकडून आर.एस. अंबरीशने ३ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. कनिष्क चौहानने फॅल्कनरला बाद करत इंग्लंडचा डाव ३११ धावांवर रोखला आणि भारताच्या १०० धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर संपूर्ण देशातून युवा खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.









