India England Lords Test | लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर इतिहास घडवण्याची भारताची संधी हुकली आहे. इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा 22 धावांनी पराभव केला आहे. यासोबतच, 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
शेवटच्या डावात भारताला विजयासाठी 193 धावांची गरज होती, पण टॉप ऑर्डरच्या अपयशामुळे भारत केवळ 170 धावांपर्यंतच मजल मारू शकला. शेवटच्या दिवशी रविंद्र जडेजाने तळाच्या फलंदाजासोबत मिळून एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही.
तिसऱ्या कसोटी सामन्यात सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 387 धावा केल्या. जो रूट (104), जेमी स्मिथ (51) आणि ब्रायडन कार्स (56) यांची खेळी लक्षवेधी ठरली. प्रत्युत्तरात भारतानेही 387 धावा केल्या, जिथे केएल राहुलने शतक झळकावले, तर ऋषभ पंत (74) आणि रवींद्र जडेजा (72) यांनी चांगली साथ दिली.
दुसऱ्या डावात इंग्लंड 192 धावांवर आटोपला, ज्यामुळे भारतासमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले गेले.
शेवटचा दिवस
चौथ्या दिवसाअखेर भारताने 58/4 अशी स्थिती गाठली होती. पाचव्या दिवशी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यावर आशा होती, पण जोफ्रा आर्चरने पंतला आणि बेन स्टोक्सने राहुलला बाद करत भारताला खिंडार पाडले. वॉशिंग्टन सुंदरला आर्चरने झेलबाद केले.
रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या 30 धावांच्या भागीदारीने थोडा दिलासा मिळाला, पण ख्रिस वोक्सने रेड्डीला बाद केले. त्यानंतर जडेजाने बुमराह आणि सिराजसोबत मिळून भारताला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विजय मिळवून देण्यात यश आले नाही.
लॉर्ड्सवरील भारताचा 13वा पराभव
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारताचा पहिला सामना 1932 साली खेळला गेला होता. या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला होता. आतापर्यंत या मैदानावर भारताला 13 वेळा पराभव स्विकारावा लागला आहे. भारताने 1986 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात पहिला विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 मध्ये एमएस धोनी आणि 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या मैदानावर संघाने विजय मिळवला आहे.