Womens World Cup 2025: आयसीसी महिला विश्वचषक 2025 मधील भारत आणि बांगलादेश यांच्यातील अखेरचा लीग टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. पावसामुळे 27 षटकांचा नवा सामना निश्चित करण्यात आला होता आणि भारताला 126 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले होते.
भारताने 8.4 षटकांत 57 धावा केल्या असताना पावसाच्या आणखी एका जोरदार सरीमुळे पंचांना सामना थांबवावा लागला आणि अखेरीस सामना रद्द करण्यात आला. आता या स्पर्धेतील सेमी फायनलला सुरू होणार आहे.
सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी सामना करावा लागेल. तर दुसरा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघात पार पडेल.
सेमीफायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना
या सामन्याच्या निकालानंतर आता सेमीफायनलची लढत सुरू होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची ही 5 वी वेळ आहे. यापूर्वी 1997, 2000, 2005 आणि 2017 च्या स्पर्धांमध्ये भारताने सेमीफायनल गाठली होती. या स्पर्धेत भारताचा सेमीफायनलचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
सामन्याचे ठिकाण आणि वेळ
स्पर्धेच्या नियमांनुसार, जर भारत उपांत्य फेरीत पोहोचला, तर त्याचा सामना नवी मुंबईत होईल. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सेमीफायनल सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.
हा सामना 30 ऑक्टोबर, गुरुवारी होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल.









