IND vs NZ T20: भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध मोठा धक्का बसला आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 41 धावांनी पराभव करत मालिका 2-1 अशी खिशात घातली.
विराट कोहलीने त्याचे 85 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावूनही भारताचा पराभव टाळता आला नाही. विशेष म्हणजे, न्यूझीलंडने भारताला त्यांच्याच घरच्या मैदानात एकदिवसीय मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या पराभवानंतर आता भारताची नजर टी-20 मालिकेवर आहे. आगामी ‘टी-20 विश्वचषक 2026’ ची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २१ जानेवारीपासून न्यूझीलंडशी ५ सामन्यांच्या मालिकेत दोन हात करेल.
संघात मोठे बदल: श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोईचे पुनरागमन
भारताला दुखापतींचे मोठे ग्रहण लागले आहे. टिळक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे बाहेर असल्याने श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई यांना संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. श्रेयस अय्यरने डिसेंबर 2023 नंतर पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, तो केवळ पहिल्या ३ सामन्यांसाठी उपलब्ध असेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड: टी-20 मालिकेचे वेळापत्रक
सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 7 वाजता सुरू होतील, तर नाणेफेक 6:30 वाजता होईल.
- पहिली टी-20: 21 जानेवारी (बुधवार) – नागपूर
- दुसरी टी-20: 23 जानेवारी (शुक्रवार) – रायपूर
- तिसरी टी-20: 25 जानेवारी (रविवार) – गुवाहाटी
- चौथी टी-20: 28 जानेवारी (बुधवार) – विशाखापट्टणम
- पाचवी टी-20: 31 जानेवारी (शनिवार) – तिरुवनंतपुरम
भारतीय टी-20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन, रवी बिश्नोई.
लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट
क्रिकेट चाहते या मालिकेचा आनंद स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर घेऊ शकतात. तसेच, मोबाईलवर जिओ हॉटस्टार (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.









