India vs Pakistan Asia Cup 2025: आशिया चषक स्पर्धेत आज भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून 128 धावांचे माफक आव्हान दिले होते. भारताने ते 15.5 षटकांत 7 गडी राखून आरामात पार केले.
कप्तान सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 47 धावा केल्या, तर कुलदीप यादवने 18 धावांत 3 बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने हा सामना खेळू नये, अशी मागणी केली जात होती. परंतु भारताने पाकिस्तानवर सफाईदार विजय मिळवल्याने क्रिकेटप्रेमी सुखावले.
आशिया चषक स्पर्धेतील दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयी षटकार खेचून भारताचा विजय निश्चित केला. भारताने पाकिस्तानच्या धावसंख्येचा पाठलाग करतानाच सुरुवातच धडाकेबाज केली. अभिषेक शर्माने 13 चेंडूंत 31 धावा केल्या. त्यात त्याने 4 षटकार आणि 2 चौकार मारले. सैम अयुबने त्याला बाद केले.
त्याआधी सैमने शुभमन गिलला 10 धावांवर यष्टीचीत केले. भारताला दोन झटके बसल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने सुत्रे हाती घेतली. त्यांनी 56 धावांची भागीदारी केली. तिलक वर्माला सैमच्या फिरकीनेच चकवले. तो 31 चेंडूंत 31 धावा करून त्रिफळाचित झाला.
त्यानंतर शुभम दुबेने सूर्यकुमार यादवच्या साथीने पाकची धावसंख्या पार केली. सैमने पाकिस्तानच्या वतीने 35 धावांत 3 बळी घेतले.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सामन्याच्या पहिल्यात षटकातील दुसऱ्याच चेंडूवर पाकची सलामीची जोडी फुटली. त्यावेळी पाकची अवस्था 2 बाद 6 धावा अशी होती.
तिसऱ्या गड्यासाठी 38 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने फरहान जमानला तिलक वर्माकडे झेल द्यायला भाग पाडले. तो 17 धावा काढून बाद झाला. आगा अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलकडे झेल देऊन बाद झाला.
त्याच्या पाठोपाठ कुलदीप यादवने लागोपाठच्या दोन चेंडूंवर हसन नवाज व मोहम्मद नवाज यांना झटपट बाद केले. त्याची हॅटट्रिक हुकली. साहिबजादा फरहानही एका बाजूने पाय रोवून होता. पण 40 धावा काढून तोही बाद झाला. पाकिस्तानला 127 धावापर्यंत मजल मारता आली.
सुर्यकुमार यादवसाठी हा सामना वाढदिवसाची भेट ठरला. हा विजय भारताला मी दिलेली रिटर्न गिफ्ट आहे अशी भावना त्याने सामन्यानंतर बोलतांना व्यक्त केली.
सामन्याला कमी गर्दी
पाकिस्तानबरोबर सामना खेळण्याला विरोध असल्याने त्याचे पडसाद मैदानातही उमटले होते. भारत व पाकिस्तान सामना कुठेही असला तरी स्टेडियम भरलेले असते. आज दुबईचे स्टेडियम मात्र त्या तुलनेत रिकामे दिसत होते. भारतीय प्रेक्षकांपेक्षा पाकिस्तानी समर्थक अधिक होते. विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेट पदाधिकारी आणि माजी क्रिकेटपटूही सामन्याकडे फिरकले नाहीत.
सूर्यकुमार यादवने विजयी कप्तान म्हणून बोलताना पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांच्या मागे असून हा विजय मी भारतीय सैन्यदलाला समर्पित करत आहे असे म्हटले.
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








