T20 World Cup Champions: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी भारतीय क्रिकेट संघाने नवा इतिहास रचला. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत भारताने विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. या दिमाखदार विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असून आयसीसीकडून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेचा आकडाही समोर आला आहे.
विजेत्या भारताला किती मिळाले पैसे?
या स्पर्धेसाठी एकूण १०१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. विश्वविजेत्या भारतीय संघाला तब्बल २१.५ कोटी रुपये मिळणार आहेत. उपविजेत्या ठरलेल्या न्यूझीलंडच्या वाट्याला १०.७५ कोटी रुपये आले आहेत. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला किमान १.०३ कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते.
बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:
- विजेता (भारत): २१.५ कोटी रुपये.
- उपविजेता (न्यूझीलंड): १०.७५ कोटी रुपये.
- उपांत्य फेरीतील पराभूत संघ: ६.२० कोटी रुपये.
- प्रत्येक सामना जिंकल्यास: २८.६४ लाख रुपये अतिरिक्त.
संजू सॅमसन आणि बुमराहची विजयी खेळी
अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसनने केवळ ४६ चेंडूंमध्ये ८९ धावांची तुफानी खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १५९ धावांत आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराहने अवघ्या १५ धावा देऊन ४ बळी घेतले, तर अक्षर पटेलने ३ फलंदाजांना बाद करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन
भारतीय संघाच्या या देदीप्यमान विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर खेळाडूंचे अभिनंदन केले. “चॅम्पियन्स! विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. हा विजय खेळाडूंचे कौशल्य, जिद्द आणि सांघिक कामगिरीचे प्रतीक आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान वाटतो,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.










