Mohammed Siraj’s Fitness Secret: वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या (England) पाचव्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. संपूर्ण मालिकेत सिराजने (Mohammed Siraj’s Fitness Secret) शानदार गोलंदाजी करत 23 विकेट्स घेतल्या.
या मालिकेत सिराजने जवळपास 185 ओव्हर टाकल्या. सर्व 5 सामने खेळूनही सिराजने थकल्याचे कोणतेही चिन्ह दिसू दिले नाही. एकीकडे फिटनेसमुळे बुमराह मालिकेतील सर्व सामने खेळू शकला नाही. तर दुसरीकडे सिराजने सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
या कामगिरीनंतर, त्याचा भाऊ मोहम्मद इस्माईल याने त्याच्या यशामागचे गुपित उघड केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी उत्कृष्ट फिटनेस राखण्यासाठी सिराजच्या कठोर मेहनत आणि शिस्तबद्ध आहाराचा मोठा वाटा असल्याचे इस्माईलने सांगितले. इंडिया टुडेशी बोलताना त्याने सिराजच्या फिटनेसाबबत माहिती दिली.
बिरयानी खात नाही, जंक फूडपासून दूर
“सिराज फिटनेसवर खूप लक्ष देतो. तो जंक फूड खाणे टाळतो आणि शिस्तबद्ध आहार पाळतो. हैदराबादमध्ये राहूनही तो क्वचितच बिरयानी खातो आणि तीही फक्त घरी बनवलेली असेल तरच. पिझ्झा किंवा फास्ट फूड तर तो खातच नाही, कारण तो आपल्या शरीराच्या बाबतीत खूपच शिस्तबद्ध आहे.”, असे सिराजच्या भावाने सांगितले.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये निवड न झाल्याने सिराज निराश झाला नाही, उलट त्याने याला एक संधी मानून आणखी कठोर परिश्रम घेतल्याचेही ईस्माईलने सांगितले. “त्याने हार मानली नाही. त्याने जिममध्ये जाऊन फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आणि सकाळ-संध्याकाळ सराव केला,” असे इस्माईल म्हणाला.
सिराजची विक्रमी कामगिरी
इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत सिराज सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने 5 सामन्यांच्या 9 डावांमध्ये 32.43 च्या सरासरीने 23 विकेट्स घेतल्या. यात दोन वेळा त्याने एकाच डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
सिराजच्या याच उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवता आली. पाचव्या कसोटीत 9 विकेट्स घेतल्याबद्दल त्याला ‘सामनावीर’ म्हणूनही गौरवण्यात आले.