IPL फायनलचं ठिकाण बदललं! आता ‘या’ मैदानावर पार पडणार अंतिम सामना

IPL 2025

IPL 2025 | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या प्लेऑफचे (Playoffs) ठिकाण जाहीर केले. त्यानुसार, अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाईल. यापूर्वी हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) होणार होता.

याच स्टेडियमवर 1 जून रोजी क्वालिफायर 2 देखील खेळवला जाईल. तर, क्वालिफायर 1 (आणि एलिमिनेटरचे सामने अनुक्रमे 29 आणि 30 मे रोजी मुल्लानपूरमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल 2025 चा हंगाम एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जाहीर केल्यावर, बीसीसीआयने सुधारित वेळापत्रक जारी केले. मात्र, प्लेऑफचे ठिकाण त्यावेळी निश्चित करण्यात आले नव्हते. यापूर्वी, आयपीएल 2025 चा अंतिम सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणार होता आणि क्वालिफायर 2 चे आयोजनही तिथेच निश्चित होते. दुसरीकडे, क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi होणार होते.

बीसीसीआयच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “हवामानाची परिस्थिती आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन आयपीएल गव्हर्निंग कॉन्सिलने प्लेऑफसाठी नवीन ठिकाणे निश्चित केली आहेत.”

बीसीसीआयने हे देखील स्पष्ट केले की, प्लेऑफप्रमाणेच लीग टप्प्यातील उर्वरित सामन्यांसाठी (remaining matches of the league stage) खेळण्याच्या वेळेत एक तासाची वाढ करण्यात आली आहे. याची सुरुवात मंगळवार, 20 मे रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने झाली आहे.

दरम्यान, आतापर्यंत गुजरात टायटन्स (Gujarat Titans), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामना चौथ्या स्थानासाठी निर्णायक असेल.