IPL 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएल 2026 बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएलच्या आगामी हंगामाच्या सुरुवातीच्या तारखेत थोडा बदल केला आहे.
आधी हा हंगाम 26 मार्चपासून सुरू होणार होता, मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल 2026 चा श्रीगणेशा 28 मार्च रोजी होणार असून अंतिम सामना 31 मे रोजी खेळवला जाणार आहे.
निवडणुकांमुळे वेळापत्रकाला विलंब
आयपीएलचे वेळापत्रक अद्याप जाहीर न होण्यामागे विधानसभा निवडणुकांचे मुख्य कारण असल्याचे समजते. आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप घोषित झालेल्या नाहीत.
कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांचे घरचे मैदान अनुक्रमे कोलकाता आणि चेन्नई येथे आहे, तर राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राऊंड गुवाहाटीमध्ये आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचा विचार करून निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच संपूर्ण वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची पुढील आठवड्यात यावर महत्त्वाची बैठक होणार आहे.
आरसीबीच्या होम ग्राऊंडबाबत पेच
विद्यमान विजेता संघ म्हणून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) पहिला सामना खेळणार आहे. मात्र, बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये आरसीबीच्या विजयाचा उत्सव साजरा करताना झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि आरसीबी व्यवस्थापनात घरच्या मैदानावरून चर्चा सुरू आहे.
पुणे किंवा नवी मुंबईचा पर्याय?
चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने खेळवण्यास काही अडचणी आल्यास, आरसीबीने आपल्या सात घरच्या सामन्यांसाठी पर्यायी मैदानांची चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये नवी मुंबई, रायपूर आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत या मैदानांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.










