Arjun Tendulkar Trade : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे मुंबई इंडियन्स (MI) संघातील स्थान धोक्यात असल्याची चर्चा आहे. आयपीएल 2026 च्या हंगामासाठी होणाऱ्या मिनी लिलावाआधी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) या दोन फ्रँचायझींमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर यांच्यात ट्रेड डील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
15 नोव्हेंबर रोजी खेळाडूंना रिटेन किंवा रिलीज करण्याची अंतिम यादी जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच अर्जुन तेंडुलकर MI मधून बाहेर पडून LSG च्या ताफ्यात सामील होण्याची आणि त्या बदल्यात शार्दुल ठाकूर MI मध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे.
ऑल कॅश ट्रान्सफर डील
रिपोर्टनुसार, ही अदलाबदल थेट खेळाडूंची स्वॅप डील नसून, ती ‘ऑल कॅश ट्रान्सफर डील’ माध्यमातून होणार आहे. आयपीएल ट्रेड नियमांनुसार, अशा व्यवहारांची अधिकृत घोषणा बीसीसीआय (BCCI) कडून केली जाते. त्यामुळे दोन्ही फ्रँचायझींनी याबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.
अर्जुन तेंडुलकरची कामगिरी आणि मुंबई इंडियन्सचा निर्णय
अर्जुन तेंडुलकर 2021 पासून मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. 2023 च्या मेगा लिलावात त्याला बेस प्राईसमध्ये संघात घेतले होते.
- 2023 मध्ये अर्जुनला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने 3 विकेट्स घेतल्या.
- 2024 मध्ये त्याला फक्त 1 सामन्यात संधी मिळाली आणि तो विकेट घेण्यात अपयशी ठरला.
- 2025 मध्ये त्याला एकाही सामन्यात खेळायला मिळाले नाही.
मुंबई इंडियन्स युवा खेळाडूंना सातत्याने संधी देण्यासाठी ओळखला जातो, पण अर्जुनला मात्र अपेक्षेनुसार संधी मिळाली नाही. सातत्याने संधी न मिळाल्याने, अर्जुनच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी हा ट्रेड एक महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो. तो आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळत असल्याने, नव्या रंगात आयपीएल गाजवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शार्दुल ठाकूरची सद्यस्थिती
शार्दुल ठाकूर मागील वर्षी झालेल्या मेगा लिलावात अनसोल्ड (न विकला गेलेला) राहिला होता. त्यानंतर LSG ने त्याला मोहसिन खानच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून ₹2 कोटी या मूळ किमतीत संघात सामील केले होते. 2025 च्या सत्रात त्याने 10 सामने खेळले आणि 13 विकेट्स घेतल्या. तो चांगली फलंदाजीही करू शकतो, ज्यामुळे तो MI साठी एक मौल्यवान अष्टपैलू खेळाडू ठरू शकतो.
हे देखील वाचा – Priyanka Chopra : देसी गर्ल इज बॅक! राजामौलींच्या ₹1000 कोटींच्या चित्रपटात प्रियांकाचा अॅक्शन अवतार; धमाकेदार पोस्टर आले समोर









