Jasprit Bumrah Test Records | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध लीड्स येथील पहिल्या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी करत आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अप्रतिम कामगिरीनंतर बुमराहने इंग्लंडच्या खेळपट्टीवरही आपली जादू कायम ठेवली.
त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना नामोहरम करत भारताला सामन्यात आघाडी मिळवून दिली आणि SENA देशांमध्ये 150 विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला. बुमराहने पहिल्या डावात 83 धावा देत 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
लीड्स कसोटीत बुमराहची जादू
लीड्सच्या सपाट खेळपट्टीवर बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांना सतावले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने तीन महत्त्वाचे बळी घेतले, तर तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात इंग्लंडच्या खालच्या फळीला गुंडाळले. जोश टंगला बाद करत त्याने 5 विकेट्स घेतले.
या 5 विकेट्ससह बुमराहने इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याचा भारतीय गोलंदाजाचा विक्राम मोडला. इंग्लंडमध्ये त्याने तीनदा अशी कामगिरी केली असून, त्याने लाला अमरनाथ, कपिल देव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. .
या कसोटीत बुमराहने परदेशात 12 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी करत माजी कर्णधार कपिल देव यांच्या विक्रामाशी बरोबरी साधली. कपिल यांनीही परदेशात 12 फायफर घेतले होते.
SENA देशांमध्ये ऐतिहासिक टप्पा
बुमराहने SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये 150 बळी घेणारा पहिला आशियाई गोलंदाज होण्याचा मान मिळवला. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमला (146 बळी) मागे टाकले. बुमराहच्या नावे आता 32 कसोटी सामन्यांत 150 बळी झाले आहेत.
SENA देशांमध्ये आशियाई गोलंदाजांचे सर्वाधिक बळी:
- जसप्रीत बुमराह: 150 बळी (32 कसोटी)
- वसीम अक्रम: 146 बळी (32 कसोटी)
- अनिल कुंबळे: 141 बळी (35 कसोटी)
- इशांत शर्मा: 130 बळी (41 कसोटी)
- मुथय्या मुरलीधरन: 125 बळी (23 कसोटी)