Kane Williamson T20 Retirement : न्यूझीलंड क्रिकेटसाठी T20 फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ नेतृत्व केलेल्या केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 13 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर हा निर्णय घेतल्यानंतर, आता विल्यमसनचे मुख्य लक्ष आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सिरीजवर असेल. ही सीरिज डिसेंबरमध्ये सुरू होत आहे.
विल्यमसनने T20 क्रिकेटमधून ब्रेक का घेतला?
35 वर्षीय विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दडपण आणि कौटुंबिक जीवनाची जबाबदारी यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी हा निर्णय घेतला. त्याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “इतका मोठा काळ या संघाचा भाग असणे माझ्यासाठी एक खास अनुभव होता. आता माझ्यासाठी आणि टीमसाठी पुढे जाण्याची ही योग्य वेळ आहे. माझ्या निर्णयामुळे संघाला पुढील T20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी नवीन रणनीती आणि नेतृत्वाच्या दृष्टीने स्पष्टता मिळेल.”
न्यूझीलंडच्या संघात अनेक युवा T20 टॅलेंट असल्यामुळेत्यांना पुढील विश्वचषकासाठी तयार करण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत त्याने व्यक्त केले. हा महत्त्वाचा निर्णय फेब्रुवारीमध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी काही महिने अगोदर आला आहे.
T20 क्रिकेटमधील विल्यमसनची कामगिरी
ऑक्टोबर 2011 मध्ये T20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून, विल्यमसनने 93 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आणि 33.44 च्या प्रभावी सरासरीने 2,575 रन्स केले. यात त्याचे 18 अर्धशतके आहेत. कर्णधार म्हणून 75 सामन्यांचे नेतृत्व करताना त्याने टीमला 2016 आणि 2022 च्या सेमी-फायनलपर्यंत आणि 2021मध्ये फायनलपर्यंत नेले.
2021 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने केलेली 85 रन्सची खेळी न्यूझीलंडच्या T20 इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या खेळींपैकी एक आहे.
T20 कर्णधारपद कोणाकडे?
विल्यमसनने यापूर्वीच मिचेल सँटनरकडे व्हाईट-बॉलचे कर्णधारपद सोपवले होते, जो यापुढेही T20 मध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व करेल. विल्यमसन म्हणाला, “मिचेल एक हुशार कर्णधार आहे. ही आता त्याची आणि युवा खेळाडूंची वेळ आहे की त्यांनी ब्लॅक कॅप्सला या फॉरमॅटमध्ये पुढे घेऊन जावे.”
सँटनरच्या नेतृत्वाखालील टीममध्ये रचिन रवींद्र, टिम सेफर्ट, टिम रॉबिन्सन आणि मार्क चॅपमन यांसारखे नवीन चेहरे असतील.
विल्यमसनचे पुढील लक्ष्य
न्यूझीलंड क्रिकेट नुसार, विल्यमसन 26 नोव्हेंबर रोजी ऑकलंडविरुद्ध प्लंकेट शील्डमध्ये नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सकडून खेळेल आणि 2 डिसेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी तयारी करेल. तो T20 फ्रँचायझी लीगमध्ये खेळणे सुरू ठेवेल.
हे देखील वाचा – OTT Releases : Family Man 3 ते Stranger Things… नोव्हेंबर महिन्यात OTT वर येणार ‘हे’ 10 मोठे चित्रपट-सिरीज









