Dickie Bird: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात आवडत्या पंचांपैकी एक असलेले दिग्गज हॅरोल्ड “डिकी” बर्ड (Harold “Dickie” Bird) यांचे नुकतेच (23 सप्टेंबर) 92 व्या वर्षी निधन झाले. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने याबाबत माहिती दिली.
बर्ड यांनी आपल्या कारकिर्दीत 66 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले, ज्यात 3 विश्वचषक फायनलचा समावेश आहे. त्यांच्या कामातील सचोटी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यामुळे ते क्रिकेट जगतात आदराने ओळखले जात.
आयसीसीचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांनी बर्ड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “डिकी बर्ड केवळ पंच नव्हते, तर ते क्रिकेटच्या जगात सचोटीचे (Integrity) प्रतीक होते. त्यांच्या स्पष्ट उपस्थितीमुळे आणि न्यायपूर्ण निर्णयामुळे त्यांना केवळ खेळाडूंकडूनच नाही, तर जगभरातील चाहत्यांकडूनही आदर मिळाला. 3 विश्वचषक फायनलमध्ये पंच म्हणून उभे राहणे, हे त्यांच्यावर असलेल्या क्रिकेट समुदायाच्या विश्वासाचे द्योतक आहे.”
LBW बाबत प्रसिद्ध असलेली त्यांची भूमिका
बर्ड यांचा पंच म्हणून कार्यकाल अनेक किस्स्यांसाठी गाजला. वेळेच्या बाबतीत त्यांची असलेली प्रचंड काळजी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची भाग बनली होती. त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे LBW अपीलांवर बोट न उचलण्याची त्यांची प्रसिद्ध अनिच्छा होती.
फलंदाजांना ‘फायदा’ देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे, त्यांच्या अनेक निर्णयांवर DRS च्या काळात त्वरित शिक्कामोर्तब झाले नसते. मात्र, त्यांच्या शेवटच्या कसोटी सामन्यात (लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत) खेळाडूंनी दिलेल्या गार्ड ऑफ ऑनरने त्यांचे डोळे पाणावले होते.
त्याच सामन्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी माईक एथरटन याला LBW आउट दिल्याची आठवण आजही सांगितली जाते.
डिकी बर्ड यांनी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या 1975, 1979 आणि 1983 या सलग तीन विश्वचषकांमध्ये अंपायर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
विशेष म्हणजे, 1983 च्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला हरवून आपला पहिला विश्वचषक जिंकला तेव्हा ते मैदानावरचे प्रत्यक्ष साक्षीदार होते आणि त्यांनीच त्या सामन्यात अंपायरिंग केली होती.
क्रिकेट कारकीर्द आणि सन्मान
पंच होण्यापूर्वी बर्ड यांनी 1956 मध्ये यॉर्कशायरकडून फलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. 93 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये त्यांची सरासरी 20.71 होती आणि त्यांनी 1959 मध्ये ग्लॅमॉर्गन विरुद्ध 181 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती.
1964 मध्ये दुखापतीमुळे त्यांची कारकीर्द खंडित झाली आणि त्यानंतर ते पंच म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. क्रिकेटमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले होते.
हे देखील वाचा – लडाखमध्ये तरुण इतके आक्रमक का झाले? काय आहेत मागण्या? जाणून घ्या