Home / क्रीडा / सचिन तेंडुलकरच्या आवाहनाला महाराष्ट्र सरकारचा तात्काळ प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

सचिन तेंडुलकरच्या आवाहनाला महाराष्ट्र सरकारचा तात्काळ प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Govt Women Sports Facilities: राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक आणि...

By: Team Navakal
Maharashtra Govt Women Sports Facilities

Maharashtra Govt Women Sports Facilities: राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) केलेल्या एका भावनिक आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत, राज्यातील सर्व क्रीडा संकुल, जिमखाना, स्टेडियम आणि स्थानिक क्रीडांगणांवर महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे.

सचिनच्या आवाहनानंतर तातडीने निर्णय

काही दिवसांपूर्वी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क जिमखानाच्या नूतनीकरणाच्या वेळी सचिन तेंडुलकर यांनी ‘देशभरातील क्रीडा संकुलांमध्ये महिलांसाठी चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करावी’, असे भावनिक आवाहन केले होते. महिलांना क्रीडांगणावर सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण मिळालेच पाहिजे, या त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद सरकारने दिला आहे.

सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था

क्रीडामंत्री ॲड. कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की, ही योजना राज्यभरातील महिला खेळाडूंना सन्मानजनक सुविधा देण्यासाठी तात्काळ राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका आणि स्थानिक पातळीवर या सुविधा प्राधान्याने उभारल्या जातील.

या चेंजिंग रूम्समध्ये स्वच्छतागृह (Restroom) आणि आरोग्य सुविधासुरक्षा आणि आरोग्य सुविधा असतील:

  • स्वच्छतागृह आणि आरोग्य सुविधा
  • सीसीटीव्हीद्वारे मर्यादित क्षेत्रात देखरेख
  • प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षा कर्मचारी यांची नियुक्ती

मंत्री कोकाटे यांनी जुनी इमारती दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन चेंजिंग रूम बांधण्यासाठी अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

महिलांचा आत्मविश्वास वाढणार

क्रीडा मंत्र्यांच्या मते, या निर्णयामुळे केवळ सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तर महिलांचा सहभाग आणि विश्वास क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढीस लागेल. “क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक मुलगी आता भीतीने नव्हे, तर अभिमानाने मैदानात उतरेल,” असे ते म्हणाले.

या निर्णयामुळे केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाओ, बेटी को खिलाओ’ या उपक्रमाला प्रत्यक्ष गती मिळणार असून, महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक मजबूत पाऊल ठरणार आहे.

हे देखील वाचा – फक्त 12,499 रुपयात लाँच झाला Samsung Galaxy M17 5G स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच

Web Title:
संबंधित बातम्या