Mohammed Shami : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि टॉलीवूडचा सुपरस्टार तसेच खासदार ‘देव’ (दीपक अधिकारी) यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत ही नोटीस देण्यात आली असून, त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण कोलकाता येथील जाधवपूर भागातील एका शाळेतून ही अधिकृत नोटीस जारी करण्यात आली.
मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाला नोटीस
मोहम्मद शमी हा मूळचा उत्तर प्रदेशचा असला तरी क्रिकेट करिअरसाठी तो गेल्या अनेक वर्षांपासून कोलकाता येथे स्थायिक झाला आहे. तो कोलकाता महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 93 मधील मतदार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शमीने नाव नोंदणीचा फॉर्म भरताना काही तांत्रिक चुका केल्या होत्या. या कारणास्तव त्याला आणि त्याचा भाऊ मोहम्मद कैफ याला निवडणूक आयोगाने पाचारण केले आहे. शमीची सुनावणी 9 ते 11 जानेवारी दरम्यान होणार आहे.
खासदार ‘देव’ यांच्या कुटुंबालाही समन्स
केवळ शमीच नाही, तर प्रसिद्ध अभिनेता आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार देव यांनाही ‘एसआयआर’ सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील इतर 3 सदस्यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. देव यांचे मूळ गाव पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील घाटाळ हे असून, सध्या ते कोलकाता येथील साऊथ सिटी कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास आहेत. या नोटिसीनंतर अद्याप देव किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
निवडणूक आयोगाच्या या पावलामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका लोकप्रतिनिधीला आणि प्रसिद्ध अभिनेत्याला अशा प्रकारे नोटीस पाठवणे हा केवळ छळाचा प्रकार असल्याचे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे. मतदारांच्या माहितीची सखोल पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ही प्रक्रिया राबवली जात असली, तरी नामांकित व्यक्तींना नोटीस मिळाल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









