‘कॅप्टन कूल’ झाला 44 वर्षांचा, धोनीच्या नावावरील ‘हे’ रेकॉर्ड तुम्हाला माहितीयेत का?

MS Dhoni Birthday

MS Dhoni Birthday | कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) आज ( 7 जुलै) 44 वर्षांचा झाला आहे. धोनीच्या 44व्या वाढदिवसानिमित्ताने (MS Dhoni Birthday) त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावरून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहे. रांचीपासून क्रिकेटला सुरूवात करणाऱ्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही त्याची लोकप्रियता आजही कायम आहे.

त्याच्या नेतृत्व कौशल्यामुळे त्याला ‘थाला’, कर्णधार, आयकॉन, दिग्गज, आयसीसी हॉल ऑफ फेमर अशी बिरुदं देखील मिळाली. धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नावावरील काही रेकॉर्ड (MS Dhoni Cricket Records) जाणून घेऊयात.

भारतासाठीधोनीने 17,266 आंतरराष्ट्रीय धावा, स्टंपमागे 829 बळी आणि चेन्नई सुपर किंग्ससह (CSK) पाच आयपीएल विजेतेपद मिळवण्याची कामगिरी केली आहे. रांचीच्या या सुपुत्राने क्रिकेटच्या मैदानावर आणि बाहेरही आपली वेगळी छाप पाडली.

धोनीची क्रिकेट कारकीर्द

2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने विकेटकीपर-फलंदाजाची भूमिका नव्याने मांडली. 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 50.57 च्या सरासरीने 10,773 धावा, 10 शतके आणि 73 अर्धशतकांसह त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला. त्याची एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 183

कसोटीत 90 सामन्यांमध्ये 4,876 धावा आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1,617 धावा त्याने केल्या आहेत. त्याचा ‘हेलिकॉप्टर शॉट’ आणि जलद स्टंपिंग नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार

धोनी हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. धोनीने भारताला आयसीसी T20 विश्वचषक 2007, आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2011 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकवली.

कसोटीत त्याने भारताला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून दिले आणि ऑस्ट्रेलियाला दोनदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये व्हाईटवॉश केले. 200 एकदिवसीय सामन्यांमध्ये 55% विजय टक्केवारी आणि 72 T20 सामन्यांमध्ये 56.94% विजय टक्केवारीसह तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या या कामगिरीसाठी काही दिवसांपूर्वीच आयसीसीने त्याचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे.

आयपीएलमधील ‘थाला’

चेन्नई सुपर किंग्सचा ‘थाला’ धोनीने आयपीएलमध्ये 278 सामन्यांमध्ये 5,439 धावा केल्या, ज्यात 24 अर्धशतके आहेत. त्याने CSK ला पाच आयपीएल आणि दोन चॅम्पियन्स लीग T20 विजेतेपदे मिळवून दिली. त्याच्या नेतृत्वाने CSK क्रीडा विश्वातील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी बनली. आज धोनीच्या 44व्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावरून त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.