MS Dhoni injury IPL 2026 CSK news : आयपीएल 2026 चा थरार आजपासून सुरू होणार असतानाच चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आली आहे. संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे (Calf Strain) हंगामातील सुरुवातीच्या किमान 2 आठवड्यांच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्सने शनिवारी सोशल मीडियाद्वारे या माहितीला दुजोरा दिला आहे.
यष्टीरक्षणाची धुरा आता संजू सॅमसनच्या खांद्यावर
धोनीच्या अनुपस्थितीत आता राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार संजू सॅमसन चेन्नईसाठी यष्टीरक्षण करताना दिसेल. या हंगामात चेन्नईने ट्रेडद्वारे संजूला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. सोमवारी गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर चेन्नईचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा हे दोघेही आपल्या जुन्या संघाविरुद्ध मैदानात उतरणार असल्याने या सामन्याबाबत मोठी उत्सुकता आहे.
धोनीचे हे शेवटचे आयपीएल?
गेल्या काही काळापासून धोनीच्या फिटनेसवर आणि गुडघ्याच्या दुखापतीवर चर्चा सुरू आहे. नुकत्याच चेपॉक स्टेडियमवर झालेल्या एका कार्यक्रमात धोनीने स्वतः मान्य केले होते की, त्याचे फिटनेस लेव्हल आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. वाढते वय आणि फिटनेसच्या समस्यांमुळे तो आता खालच्या फळीत फलंदाजीला येत आहे. चेन्नईने संजू सॅमसनला संघात घेणे आणि युवा यष्टीरक्षक कार्तिक शर्मावर 14.20 कोटींची मोठी बोली लावणे, हे धोनीनंतरच्या काळाची तयारी असल्याचे मानले जात आहे.
धोनीची आयपीएल कारकीर्द
महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत 278 सामन्यांतील 242 डावांमध्ये 38.30 च्या सरासरीने आणि 137.45 च्या स्ट्राईक रेटने 5,439 धावा केल्या आहेत. यामध्ये 24 अर्धशतकांचा समावेश असून 84 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो 6 व्या क्रमांकावर आहे.
चेन्नईचा संघ यंदा विक्रमी 6 वे विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे, मात्र ‘थाला’च्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघाच्या रणनीतीवर मोठा परिणाम होऊ शकतो.









