IPL Retention : आगामी IPL 2025 रिटेन्शनची अंतिम मुदत (15 नोव्हेंबर) जवळ येत असताना खेळाडूंच्या अदलाबदलीच्या (जोरदार चर्चांना क्रिकेट जगतात उधाण आले आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याला चेन्नई सुपर किंग्सने (CSK) संघात घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
मात्र, या सर्व अफवांना चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन (Kasi Viswanathan) यांनी पूर्णविराम दिला आहे. संजू सॅमसनला ट्रेड करण्याची कोणतीही शक्यता आहे का, असे विचारले असता विश्वनाथन यांनी “नाही, शक्यता नाही, अजिबात शक्यता नाही,” असे स्पष्ट उत्तर दिले. ट्रेडमधील पुढील कोणतीही माहिती लवकरच समोर येईल, असेही त्यांनी नमूद केले.
धोनी IPL 2026 मध्ये खेळणार, CEO यांची घोषणा
दरम्यान, सीईओ काशी विश्वनाथन यांनी CSK च्या चाहत्यांसाठी मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे. भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हा पाच वेळा IPL विजेतेपद (Championship) पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी IPL 2026 मध्येही खेळणार आहे.
IPL 2025 मध्ये ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाल्यावर धोनीने नेतृत्वाची धुरा पुन्हा सांभाळली होती. धोनी हा 2008 पासून लीगच्या सुरुवातीपासूनच CSK चा आधारस्तंभ राहिला आहे.
“तो (धोनी) खेळेल अशी दाट शक्यता आहे. आमच्या माहितीनुसार, तो आगामी IPL मध्ये नक्की खेळणार आहे,” असे विश्वनाथन यांनी शुक्रवारी सांगितले.
2016 आणि 2017 मध्ये फ्रँचायझीवर बंदी असतानाचा अपवाद वगळता, धोनी सतत CSK सोबत आहे. IPL 2026 मध्ये तो CSK सोबतचा आपला 17 वा आणि IPL मधील एकूण 19 वा हंगाम खेळेल.
धोनीने CSK साठी 248 सामने खेळले आहेत, 4,865 धावा केल्या आहेत आणि 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये संघाला 5 IPL विजेतेपदे मिळवून दिली आहेत.
CSK साठी IPL 2025 चा हंगाम निराशाजनक ठरला होता, कारण 14 पैकी फक्त 4 सामने जिंकून ते गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होते.
हे देखील वाचा – Land Scam Allegation : राज्यात जमीन घोटाळ्यांची मालिका? पार्थ पवारांनंतर आता सरकारमधील मंत्र्यावर विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप









