Navjot Singh Sidhu on Viral Post: सध्या भारतीय क्रिकेटपटूंसोबतच प्रशिक्षक आणि निवडकर्ते देखील विशेष चर्चेत आहेत. भारतीय क्रिकेटमधील कोणत्याही निर्णयाला सध्या प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना जबाबदार धरले जाते. मात्र, त्यांच्याविरोधात नावाने सोशल मीडियावर फेक संदेश देखील व्हायरल केले जात आहे.
नुकतेच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे एका फेक न्यूजचे शिकार झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबद्दलचे एक खोटे वक्तव्य त्यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमके काय होते प्रकरण?
19 ऑक्टोबरला पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर, ‘Jod Insane’ नावाच्या ‘X’ यूजरने गंभीर आणि आगरकर यांचा एक फोटो पोस्ट केला. त्यासोबत सिद्धूंचे वक्तव्य असल्याचे भासवले होते. “जर भारताला 2027 चा विश्वचषक जिंकायचा असेल, तर बीसीसीआयने अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना लवकरात लवकर हटवून रोहित शर्माकडे पूर्ण आदराने पुन्हा कर्णधारपद सोपवावे.”, असे त्यामध्ये लिहिले होते. तसेच, हे वक्तव्य नवज्योतसिंग सिद्धू यांनी केल्याचे दर्शवण्यात आले होते.
सिद्धू यांची संतप्त प्रतिक्रिया:
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूयांनी ‘X’ वर पोस्ट करून यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आणि त्यांचे मत स्पष्ट केले. त्यांनी ती मूळ पोस्ट रिट्विट करत लिहिले, “मी असे कधीही म्हटले नाही, खोटी बातमी पसरवू नका, मी अशी कल्पनाही केली नाही. लाज वाटायला हवी!” सिद्धूंच्या या प्रतिक्रियेनंतर त्या यूजरने लगेच आपली पोस्ट काढून टाकली.
दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू फेक न्यूजचा बळी होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुनील गावसकर, विराट कोहली, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासारखे खेळाडूही खोट्या बातम्यांचे बळी ठरले आहेत.
हे देखील वाचा – Asrani Death :’शोले’चे ‘जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन