Neeraj Chopra conferred with Lieutenant Colonel rank | दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलचा मानद दर्जा मिळाला. ‘द गॅझेट ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्या नियुक्तीची अंमलबजावणी 16 एप्रिलपासून झाली आहे. शुक्रवारी दोहा डायमंड लीगमध्ये आपल्या हंगामाची सुरुवात करणारा नीरज यापूर्वी 2024 मध्ये सुभेदार मेजर बनला होता.
लष्करी व्यवहार विभागाचे सहसचिव मेजर जनरल जी.एस. चौधरी यांच्या निवेदनानुसार, राष्ट्रपतींनी माजी सुभेदार मेजर नीरज चोप्रा यांना 16 एप्रिल 2025 पासून लेफ्टनंट कर्नलचा मानद दर्जा दिला आहे.
27 वर्षीय नीरजला त्याच्या यशस्वी कारकिर्दीत मिळालेल्या अनेक सन्मानांमध्ये हा आणखी एक मानाचा तुरा आहे. नीरज आतापर्यंतचा महानतम भारतीय ॲथलीट म्हणून ओळखला जातो. नीरजची यापूर्वी 26 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून भरती झाली होती. दोन वर्षांनंतर, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरल्यानंतर त्याला अर्जुन पुरस्कार मिळाला.
2021 मध्ये सुभेदार पदावर पदोन्नती मिळण्यापूर्वी त्याला खेलरत्न आणि विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले. त्यानंतर 2022 मध्ये नीरजला भारतीय सशस्त्र दलातील सर्वोच्च शांतताकालीन पदक, परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी त्याची सुभेदार मेजर पदावर पदोन्नती झाली. याच काळात, नीरज टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून ॲथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. त्यानंतर 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकणारा तो तिसरा भारतीय ॲथलीट ठरला.
दोहा डायमंड लीगनंतर, नीरज 23 मे रोजी चोरझो, पोलंड येथे होणाऱ्या जानुस कुसोसिंस्की मेमोरियल स्पर्धेत भाग घेणार आहे. त्यानंतर 24 जून रोजी झेक प्रजासत्ताकमधील ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025 स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. दुखापतीमुळे नीरजला या स्पर्धेच्या मागील दोन आवृत्त्यांमधून माघार घ्यावी लागली होती.