एका दिवसात 3 निवृत्ती! क्रिकेटपटूंनंतर आता ‘या’ स्टार कबड्डीपटूने सोडले मैदान

Pardeep Narwal Retirement

Pardeep Narwal Retirement | क्रीडा जगतात एकामागोमाग एक आश्चर्यकारक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) एकदिवसीय क्रिकेटमधून (ODI) निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेटपाठोपाठ आता कबड्डीमधूनही प्रसिद्ध खेळाडू निवृत्ती घेत आहेत.

नुकतेच प्रदीप नरवाल (Pardeep Narwal) याने प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) मधून निवृत्ती जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या PKL च्या 12 व्या हंगामासाठीच्या लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने त्याला खरेदी न केल्याने, हा निर्णय घेतल्याचे समजते. डुबकी किंग म्हणून प्रसिद्ध असलेला प्रदीप हा प्रो कबड्डी लीगमधील सर्वात लोकप्रिय व यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे.

2015 मध्ये पदार्पण केल्यापासून, प्रदीप नरवाल याने कबड्डीच्या मैदानावर आपली वेगळी छाप सोडली. त्याच्या डुबकी (dubki) या खास खेळीमुळे तो सर्वश्रेष्ठ रेडर म्हणून प्रसिद्ध झाला. 190 सामन्यांमध्ये 1801 रेड पॉइंट्स (raid points) मिळवले, जे PKL इतिहासातील सर्वोच्च कामगिरी आहे. त्याने पटना पायरेट्स (Patna Pirates) सोबत तीन सलग हंगामात विजेतेपद मिळवले. 2021 मध्ये UP Yoddha ने 1.65 कोटी रुपयांना खरेदी केले, ज्यामुळे तो लीगमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

कबड्डी चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का म्हणजे, PKL 2025 च्या लिलावात नरवालला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. संघांनी युवा खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती स्वीकारली, ज्यामुळे नरवालच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

प्रदीप नरवाल हा कबड्डीतील दिग्गज खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याची रेडिंग कौशल्ये आणि चपळ चाली आगामी हंगामात दिसणार नाहीत, ही बाब चाहत्यांसाठी नक्कीच निराशाजनक आहे.