Rohit Kohli Next Match: ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली निवृत्त होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, मालिकेतील शेवटच्या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी शानदार खेळी करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आता क्रिकेट चाहते हे दोन्ही खेळाडू मैदानावर पुन्हा कधी दिसणार, याची वाट पाहत आहे.
आता हे दोन्ही स्टार खेळाडू आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले असल्याने, त्यांना मैदानात पाहण्यासाठी चाहते अधिक आतुर आहेत.
पुढील टी-20 मालिकेत कोहली-रोहित नसणार
या दौऱ्यातील ॲक्शनआता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट टी-20 मालिकेकडे वळली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथील मानुका ओव्हलवर होणार आहे. मात्र, रोहित आणि कोहली या दोघांनीही या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यामुळे ते या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.
पुढील एकदिवसीय मालिका कधी?
त्यामुळे या दोन खेळाडूंना पुन्हा मैदानात कधी पाहायला मिळेल, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. हे दोन्ही खेळाडू फक्त एकदिवसीय सामन्यांच्या फॉरमॅटमध्ये खेळत असल्यामुळे, चाहत्यांना त्यांच्या पुढील एकदिवसीय सामन्याची वाट पाहावी लागेल.
भारताची पुढील एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. ही 3 सामन्यांची मालिका असून, त्याचे आयोजन भारतातच केले जाणार आहे.
- या मालिकेतील पहिला सामना 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे होईल.
- त्यानंतर पुढील 2 सामने 3 डिसेंबर रोजी रायपूर आणि 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहेत.
विश्वचषक 2027 च्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची असेल. शुभमन गिलने नुकतेच एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले आहे आणि या मालिकेमुळे त्याला आपल्या संघातील खेळाडूंना आणि रणनीतीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल.









