रोहित आणि विराटने कधीपर्यंत वनडे क्रिकेट खेळावे? सौरव गांगुली म्हणाला…

Sourav Ganguly on Rohit Sharma- Virat Kohli ODI Retirement

Sourav Ganguly on Rohit Sharma- Virat Kohli ODI Retirement: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, आता दोघे 2027 च्या वर्ल्डकप पर्यंत एकदिवसीय सामने खेळणार की नाही? याबाबत प्रश्न विचारला जात आहे. आता यावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने भाष्य केले आहे.

ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी एकदिवसीय मालिका या दोन्ही खेळाडूंची या फॉरमॅटमधील शेवटची मालिका असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. चर्चा माध्यमांमध्ये सुरू होत्या. भारताच्या 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाचीतयारी ऑस्ट्रेलिया दौऱ्याने सुरू होणार आहे. या दौऱ्यात विराट आणि रोहित एकदिवसीय फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

सौरव गांगुलीला दोन्ही खेळाडूंच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याबाबत विचारले असता, जो चांगली कामगिरी करेल तो पुढेही खेळत राहिल असे मत व्यक्त केले.

निवृत्तीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना गांगुली म्हणाला की, त्याला या घडामोडीबद्दल काहीही माहिती नाही. “मला याची माहिती नाही, त्यामुळे मी यावर भाष्य करू शकत नाही,” मात्र, खेळाडूचे करियर त्याच्या कामगिरीवर अवलंबून असते, या विचाराशी त्याने सहमती दर्शवली.

गांगुली म्हणाला, “हे सांगणे कठीण आहे. जो चांगली कामगिरी करेल तोच खेळेल. जर ते चांगले खेळत असतील, तर त्यांनी खेळत राहावे. कोहलीचा एकदिवसीय रेकॉर्ड खूपच चांगला आहे, रोहित शर्माचाही. हे दोघेही व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये अप्रतिम आहेत.”

दरम्यान, रिपोर्टनुसार, रोहित आणि विराटला 2027 च्या विश्वचषकापर्यंत खेळायचे असेल, तर त्यांना देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा ‘विजय हजारे ट्रॉफी’मध्ये खेळावे लागण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या (BCCI) या अटीमुळे दोघेही निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात, असेही म्हटले जात आहे.