सरफराज खानने तब्बल 17 किलो वजन केले कमी; केविन पीटरसनकडून कौतुक; पृथ्वी शॉला दिला ‘हा’ सल्ला

Sarfaraz Khan Weight Loss

Sarfaraz Khan Weight Loss: भारतीय क्रिकेटपटू सरफराज खान (Sarfaraz Khan Weight Loss) सध्या आपल्या फिटनेसमधील बदलांमुळे चर्चेत आला आहे. सरफराजने अवघ्या काही महिन्यांत तब्बल 17 किलो वजन कमी करून अधिक तंदुरुस्त आणि आत्मविश्वास असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने देखील सरफराज खानचे यासाठी कौतुक केले. विशेष म्हणजे पीटरसनने सरफराजचे कौतुक करताना क्रिकेटपटू पृथ्वी शॉ ला देखील सल्ला दिला आहे.

पीटरसनने सोशल मीडियावरून सरफराजच्या मेहनतीचं भरभरून कौतुक करत त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

“उत्कृष्ट प्रयत्न, यंग मॅन! अभिनंदन! मला खात्री आहे की हा फिटनेस तुझ्या कामगिरीत सातत्य आणेल. तू तुझ्या प्राधान्यांची जी निवड केलीस, ती प्रेरणादायक आहे. कोणीतरी पृथ्वी शॉला हे दाखवा, कृपया? हे शक्य आहे. असं पीटरसनने लिहिलं. सरफराजचा हा फोटो व्हायरल होत असून, सर्वत्र त्याच्या फिटनेसचे कौतुक होत आहे.

सरफराजने या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत भारताकडून कसोटी पदार्पण केले. अनेक वर्षांच्या रणजी करंडक आणि इतर देशांतर्गत स्पर्धांमधील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याला ही संधी मिळाली होती. मात्र, आश्वासक कामगिरी करूनही, त्याला अद्याप भारतीय कसोटी संघात नियमित स्थान मिळवता आलेले नाही.

दरम्यान, पीटरसनने सरफराजचे कौतुक करत पृथ्वी शॉला देखील फिटनेसचा सल्ला दिला. पृथ्वी शॉने मुंबई संघातून बाहेर पडून आता महाराष्ट्र संघात प्रवेश घेतला आहे. जूनमध्ये त्याने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतल्यावर हा निर्णय घेतला. एका निवेदनात त्याने म्हटलं की, “माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर महाराष्ट्र संघात खेळणं मला नवा अनुभव आणि वाढ देईल. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मी मन:पूर्वक आभार मानतो.”