T20 World Cup 2026 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने एक मोठी घोषणा केली असून, 2026 च्या पुरुष टी20 विश्वचषकात बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचा संघ खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत भारतात होणाऱ्या या स्पर्धेतील आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी बांगलादेशने केली होती, जी आयसीसीने फेटाळून लावली.
क्रिकेटच्या इतिहासात सुरक्षा किंवा राजकीय कारणांमुळे संघांनी माघार घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशाच काही प्रमुख घटनांची ही यादी:
क्रिकेट विश्वातील गाजलेले ६ बहिष्कार:
1. टी20 विश्वचषक 2026: बांगलादेशची माघार
भारतात सुरक्षा धोका असल्याचे सांगत बांगलादेशने सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली होती. आयसीसीला कोणताही ठोस धोका न आढळल्याने त्यांनी ही मागणी फेटाळली, परिणामी बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली आणि स्कॉटलंडला संधी मिळाली.
2. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: भारताचा पाकिस्तान दौरा नाकारला
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे अखेर ‘हायब्रीड मॉडेल’चा वापर करण्यात आला आणि भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात आले.
3. अंडर-19 विश्वचषक 2016:
2016 मध्ये बांगलादेशात झालेल्या अंडर-19 विश्वचषकातून ऑस्ट्रेलियाने सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतली होती. त्यांच्या जागी आयर्लंडचा समावेश करण्यात आला होता.
4. टी20 विश्वचषक 2009: झिम्बाब्वेचा बहिष्कार
ब्रिटन आणि झिम्बाब्वेमधील राजकीय संघर्षामुळे झिम्बाब्वे संघाने 2009 च्या विश्वचषकातून स्वतःहून माघार घेतली होती. व्हिसा मिळण्यातील अडचणी आणि संभाव्य वाद टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
5. वनडे विश्वचषक 2003: इंग्लंड आणि न्यूझीलंडची माघार
2003 मध्ये इंग्लंडने राजकीय दबावामुळे झिम्बाब्वेमध्ये खेळण्यास नकार दिला होता, तर न्यूझीलंडने सुरक्षा कारणास्तव केनियाला जाण्यास नकार दिला होता. या दोन्ही संघांनी गुणांचे नुकसान सोसले पण खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.
6. वनडे विश्वचषक 1996: श्रीलंका दौरा नाकारला
श्रीलंकेतील गृहयुद्ध आणि कोलंबोमधील बॉम्बस्फोटामुळे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने तिथे जाण्यास नकार दिला होता. भारताने मदतीचा हात पुढे करून तिथे सामने खेळले, पण या दोन्ही दिग्गज संघांनी श्रीलंकेला वॉकओव्हर देणे पसंत केले.









