Shikhar Dhawan Wedding: भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शिखरने त्याची मैत्रीण सोफी शाइन हिच्याशी दिल्ली-एनसीआर परिसरात एका खाजगी समारंभात विवाह केला. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती, ज्यावर आता अधिकृत मोहोर उमटली आहे.
मैदानावरील मित्राने दिले लग्नाचे अपडेट
शिखरच्या लग्नाचे पहिले फोटो त्याचा जवळचा मित्र आणि क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “मेरे यार की शादी है” असे कॅप्शन देत चहलने या जोडप्याचे फोटो पोस्ट केले, जे पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या विवाह सोहळ्याला केवळ जवळचे कुटुंबीय आणि मोजकेच मित्र उपस्थित होते.
कोण आहे सोफी शाइन?
शिखरची पत्नी सोफी शाइन ही मूळची आयर्लंडची आहे. ती एक नामांकित प्रॉडक्ट कन्सल्टंट असून सध्या अबू धाबी येथील नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये सेकंड व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे. सोफीने आयर्लंडमधील लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. हे दोघे 2025 पासून एकमेकांना डेट करत होते आणि 12 जानेवारी 2026 रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता.
शिखरचा दुसरा विवाह
हे शिखर धवनचे दुसरे लग्न आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये त्याचा आयेशा मुखर्जीशी घटस्फोट झाला होता. आयेशा आणि शिखर यांचे लग्न 11 वर्षे टिकले होते. त्यांना जोरावर नावाचा मुलगा असून, त्याच्या भेटीगाठीवरून सध्या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. जुन्या आठवणी मागे सारून शिखरने आता सोफीसोबत आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे.
लग्नापूर्वी या जोडप्याचे हळद आणि संगीत समारंभही उत्साहात पार पडले. शिखरने संगीत सोहळ्याचे फोटो शेअर करताना “ऑलमोस्ट द धवन्स” असे भाष्य केले होते. आता अधिकृतपणे हे दोघे पती-पत्नी झाले असून सोशल मीडियावर त्यांच्या जोडीचे कौतुक होत आहे.











