Home / क्रीडा / श्रेयस अय्यरला मिळाली मोठी जबाबदारी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार भारतीय संघाचे नेतृत्व

श्रेयस अय्यरला मिळाली मोठी जबाबदारी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार भारतीय संघाचे नेतृत्व

Shreyas Iyer Captain

Shreyas Iyer Captain: एशिया कप संघातून वगळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला BCCI ने मोठी संधी दिली आहे. श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलिया ‘ए’ विरुद्ध होणाऱ्या दोन चार दिवसीय सामन्यांमध्ये India A संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केली आहे.

श्रेयस अय्यरला हे नेतृत्वपद आगामी काळात रोहित शर्माकडून एकदिवसीय कर्णधारपद मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले आहे. अय्यरला एशिया कपमधून वगळल्यानंतर बीसीसीआयवर टीका झाली होती. त्यानंतर श्रेयसला पुढील एकदिवसीय कर्णधार म्हणून पाहिले जात आहे आणि तो लवकरच रोहित शर्माची जागा घेऊ शकतो, असेही म्हटले जात होते. त्यातच आथा त्याच्याकडे India A संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून 600 हून अधिक धावा 175 च्या स्ट्राइक रेटने करत संघाला 11 वर्षांनंतर पहिल्यांदा अंतिम सामन्यात पोहोचवले होते. तरीही त्याला एशिया कपमधून वगळल्यामुळे निवड समितीवर जोरदार टीका झाली होती.

2024 पासून तो भारतीय कसोटी संघातूनही बाहेर आहे. ऑस्ट्रेलिया ‘ए’ विरुद्धच्या या सामन्यातील चांगली कामगिरी त्याला वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मायदेशातील कसोटी मालिकेत स्थान मिळवून देण्यास उपयुक्त ठरू शकते.

केएल राहुल आणि मोहम्मद सिराजला संधी

या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांचाही समावेश India A संघात होणार आहे. ते दोघे संघातील दोन खेळाडूंची जागा घेतील. सध्या एशिया कप संघात या दोघांचाही समावेश नाही. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेनंतर त्यांना पुरेशी विश्रांती मिळाली आहे.

या दोन्ही संघांमधील पहिला सामना 16 सप्टेंबरला आणि दुसरा 23 सप्टेंबरला लखनौमध्ये खेळला जाईल.

ऑस्ट्रेलिया ‘ए’ विरुद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी India A संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, एन जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटियान, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकूर.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

Flipkart सेलमध्ये ‘या’ 5 स्मार्टफोन्सवर मिळणार मोठी सूट; वाचा संपूर्ण माहिती