Smriti Mandhana : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असली, तरी संर्वांचे लक्ष भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने रचलेल्या ऐतिहासिक विक्रमाकडे वेधले गेले आहे.
स्मृतीने या सामन्यात फलंदाजीला उतरताच टी20 क्रिकेटमधील एका अशा शिखरावर गवसणी घातली आहे, जिथे आजवर कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला पोहोचता आले नव्हते.
४००० धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय
स्मृती मानधनाने श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात वैयक्तिक 25 धावांची खेळी केली. या छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर तिने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. हा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. विशेष म्हणजे, भारताच्या पुरुष संघात केवळ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाच हा टप्पा ओलांडता आला आहे. आता स्मृतीचा समावेश जगातील निवडक दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत झाला आहे.
सुझी बेट्सला मागे टाकून वेगवान विक्रम
जागतिक स्तरावर महिला टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी स्मृती केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने हा टप्पा गाठला होता. मात्र, स्मृतीने हा विक्रम अत्यंत कमी चेंडूंमध्ये पूर्ण केला आहे. सुझी बेट्सला 4000 धावा पूर्ण करण्यासाठी 3675 चेंडू खेळावे लागले होते, तर स्मृतीने केवळ 3227 चेंडूंमध्ये हा ऐतिहासिक टप्पा गाठला. यामुळे ती टी20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान 4000 धावा करणारी खेळाडू ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावांच्या उंबरठ्यावर
स्मृती मानधना आता केवळ टी20 मध्येच नाही, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एका मोठ्या विक्रमाच्या जवळ पोहोचली आहे. तिने आतापर्यंत टी20 मध्ये 4007, एकदिवसीय सामन्यात 5322 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 629 धावा केल्या आहेत. तिची एकूण धावसंख्या आता 9958 झाली असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यासाठी तिला आता केवळ 42 धावांची आवश्यकता आहे. आगामी सामन्यात ती हा पराक्रम सहज पूर्ण करेल अशी चाहत्यांना खात्री आहे.
हे देखील वाचा – Electric Cars: डिझेल-पेट्रोलचे टेन्शन सोडा! 7 लाखांच्या बजेटमध्ये घरी न्या इलेक्ट्रिक कार; पाहा टॉप 3 स्वस्त पर्याय









