IND vs PAK T20 World Cup: कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह गतविजेत्या भारताने टी-20 विश्वचषक 2026 च्या ‘सुपर 8’ फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धचा हा भारताचा 8 वा विजय ठरला आहे. या मोठ्या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अत्यंत हृदयस्पर्शी विधान केले आहे.
सूर्याने देशवासीयांना समर्पित केला विजय
सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “हा विजय संपूर्ण भारतासाठी आहे. आम्हाला ज्या आक्रमक पद्धतीने क्रिकेट खेळायचे होते, अगदी तसेच आम्ही खेळलो. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे हा एक चांगला निर्णय ठरला.” भारताची सुरुवात खराब झाली होती, मात्र त्यानंतर इशान किशनने डावाची सूत्रे हाती घेतली. सूर्याने इशानचे कौतुक करताना म्हटले की, “शून्यावर एक विकेट गेल्यानंतर कुणीतरी जबाबदारी घेणे गरजेचे होते आणि इशानने ते उत्तमरीत्या पार पाडले.”
असा रंगला सामना
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना इशान किशनच्या वादळी 77 धावांच्या जोरावर 175 धावा उभारल्या. मधल्या षटकांत धावगती थोडी कमी झाली होती, परंतु रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांत फटकेबाजी करत भारताला 170 च्या पार नेले. कर्णधाराच्या मते, हा धावसंख्या आव्हानात्मक होती आणि संघाने अपेक्षेपेक्षा 15 धावा अधिक केल्या होत्या.
गोलंदाजांचा भेदक मारा
176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या जोडीने पाकिस्तानच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडले. बुमराहने केवळ 17 धावा देत 2 बळी टिपले, तर हार्दिकने 16 धावांत 2 गडी बाद केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम देखील स्वस्तात परतला. संपूर्ण पाकिस्तानचा संघ केवळ 114 धावांत गारद झाला.
या विजयामुळे भारतीय संघाने आपले सुपर 8 मधील स्थान निश्चित केले असून आता पुढील आव्हानांसाठी संघ अहमदाबादकडे रवाना होणार आहे.










