Team India Next Schedule: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वविजेतेपदाचा गुलाल उधळल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष टीम इंडियाच्या पुढील मोहिमेकडे लागले आहे. न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष संपत नाही तोच भारताच्या आगामी घरच्या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे.
केव्हा आहे भारताचा पुढचा सामना?
विश्वचषकाच्या विजयानंतर आणि आयपीएल २०२६ च्या हंगामानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध दोन हात करणार आहे. या दौऱ्यात एक कसोटी सामना आणि ३ सामन्यांची वन-डे मालिका खेळवली जाईल.
कसोटीत शुभमन गिलचे नेतृत्व आणि नव्या चेहऱ्याची एन्ट्री
आगामी घरच्या मोसमासाठी शुभमन गिल कसोटी संघाचा कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे. या कसोटीत सर्वांचे लक्ष जम्मू-काश्मीरच्या आकिब नानी या युवा खेळाडूवर असेल. रणजी करंडकात ६० बळी घेणाऱ्या या वेगवान गोलंदाजाचे कसोटी पदार्पण जवळपास निश्चित मानले जात आहे.
विराट-रोहितचे वन-डे संघात पुनरागमन
कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या वन-डे मालिकेत दिग्गज जोडी विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात परतणार आहेत. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीत भारतीय संघ आपली रणनीती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान: पूर्ण वेळापत्रक २०२६
एकमेव कसोटी सामना
- तारीख: ६ जून ते १० जून २०२६ (शनिवार ते बुधवार)
- ठिकाण: न्यू चंदीगड
- वेळ: सकाळी ९:३० वाजता
एकदिवसीय (ODI) मालिका
- पहिली वन-डे: १४ जून २०२६ (रविवार), धर्मशाळा, दुपारी १:३० वाजता.
- दुसरी वन-डे: १७ जून २०२६ (बुधवार), लखनौ, दुपारी १:३० वाजता.
- तिसरी वन-डे: २० जून २०२६ (शनिवार), चेन्नई, दुपारी १:३० वाजता.










