Home / क्रीडा / India vs England Semifinal : चंद्रग्रहणामुळे भारतीय क्रिकेट संघाने सराव टाळला! ‘अशुभ’ वेळेचे दिले कारण

India vs England Semifinal : चंद्रग्रहणामुळे भारतीय क्रिकेट संघाने सराव टाळला! ‘अशुभ’ वेळेचे दिले कारण

India vs England Semifinal : टी-20 विश्वचषकाच्या अत्यंत महत्त्वाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे. 5 मार्च रोजी...

By: Team Navakal
India vs England Semifinal
Social + WhatsApp CTA

India vs England Semifinal : टी-20 विश्वचषकाच्या अत्यंत महत्त्वाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे. 5 मार्च रोजी होणाऱ्या या महामुकाबल्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करेल अशी अपेक्षा होती.

मात्र, मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणारे सराव सत्र भारतीय खेळाडूंनी अचानक पुढे ढकलले. या निर्णयामागे कोणतेही तांत्रिक किंवा खेळाशी संबंधित कारण नसून ‘चंद्रग्रहण’ हे धार्मिक कारण असल्याचे समोर आले आहे.

नेमकी घटना काय?

वेस्ट इंडिजविरुद्धचा महत्त्वाचा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ सोमवारी मुंबईत दाखल झाला होता. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता टीम इंडियाचा सराव सुरू होणार होता. मात्र, याच काळात चंद्रग्रहण असल्याने खेळाडूंनी सरावास नकार दिला. खेळाडूंनी ही वेळ ‘अशुभ’ असल्याचे मानून सराव सत्र 1 तास पुढे नेण्याचा निर्णय घेतला. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:47 वाजता सराव सुरू होणे अपेक्षित होते, पण ग्रहण काळ संपेपर्यंत खेळाडूंनी मैदानात उतरणे टाळले.

धार्मिक श्रद्धा आणि खेळाडूंचे दर्शन

केवळ सराव टाळलाच नाही, तर भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने या काळात पारंपरिक रीतिरिवाजांचे पालन केले. कर्णधार सूर्यकुमार यादव, युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबईतील विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले.

विज्ञानामध्ये ग्रहणाच्या वेळेला अशुभ मानण्याचे कोणतेही पुरावे नसले, तरी भारतीय खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक श्रद्धांना प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे.

वानखेडेवर कोणाचे पारडे जड?

उपांत्य फेरीचा हा सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावर इंग्लंडचा रेकॉर्ड संमिश्र राहिला आहे. इंग्लंडने येथे आतापर्यंत खेळलेल्या 6 टी-20 सामन्यांपैकी 3 जिंकले आहेत तर 3 गमावले आहेत. दुसरीकडे, भारतीय संघाचा या मैदानावर दबदबा असून 2017 पासून टीम इंडिया येथे एकही सामना हरलेली नाही.

विशेष म्हणजे, भारत आणि इंग्लंड यांच्यातील गेल्या दोन उपांत्य फेरीतील सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एकदा बाजी मारली आहे. ज्या संघाने ही फेरी जिंकली, त्यानेच गेल्या दोन विश्वचषकांमध्ये ट्रॉफीवर नाव कोरले आहे, त्यामुळे या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या