IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आशिया चषक स्पर्धेचा हिरो ठरलेला धडाकेबाज फलंदाज तिलक वर्मा याला दुखापतीमुळे मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांना मुकावे लागणार आहे. ही दुखापत अशा वेळी झाली आहे जेव्हा विश्वचषक स्पर्धेला आता 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.
तिलक वर्माला नेमकं काय झालं?
23 वर्षांचा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा विजय हजारे करंडक स्पर्धेत हैदराबादकडून खेळत होता. राजकोटमध्ये खेळताना त्याला अचानक पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासात त्याला टेस्टिक्युलर टॉर्शन ही समस्या असल्याचे समोर आले, ज्यासाठी डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. सुदैवाने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याला आता रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
तो पुढील प्रशिक्षणासाठी लवकरच हैदराबादला रवाना होईल. तो शेवटच्या 2 सामन्यात खेळणार की नाही, हे त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल.
श्रेयस अय्यरचे दणक्यात पुनरागमन
एकिकडे तिलक वर्मा बाहेर पडला असताना, दुसरीकडे भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारताचा वनडे उपकर्णधार श्रेयस अय्यर आता पूर्णपणे फिट झाला आहे. बंगळुरू येथील वैद्यकीय पथकाने त्याला सामन्यासाठी सज्ज घोषित केले आहे. श्रेयसने विजय हजारे करंडकमध्ये मुंबईकडून खेळताना केवळ 53 चेंडूत 82 धावांची वादळी खेळी करत आपली लय सिद्ध केली आहे.
भारत वि. न्यूझीलंड वेळापत्रक:
- 11 जानेवारी: पहिली वनडे, वडोदरा
- 14 जानेवारी: दुसरी वनडे, राजकोट
- 18 जानेवारी: तिसरी वनडे, इंदूर
- 21 जानेवारी: पहिली टी20, नागपूर
- 23 जानेवारी: दुसरी टी20, रायपूर
- 25 जानेवारी: तिसरी टी20, गुवाहाटी
- 28 जानेवारी: चौथी टी20, विशाखापट्टणम
- 31 जानेवारी: पाचवी टी20, तिरुवनंतपुरम
न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, रिंकू सिंह, हर्षित राणा आणि ईशान किशन (यष्टीरक्षक).









