Virat Kohli | भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्ध 20 जूनपासून सुरू होणाऱ्या मालिकेपूर्वी कोहलीने BCCI ला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. तो इंग्लंडमधील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे.
काही दिवसांपूर्वीच कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. आता विराटच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, निवृत्तीबाबत विराट अथवा बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विराट कोहलीशी बोलून त्याला आपला निर्णय पुनर्विचारण्याची विनंती केली आहे. त्यामुळे कोहली निवृत्तीबाबत पुनर्विचार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोहली आणि रोहित या दोघांनीही गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस येथे भारताच्या विश्वचषक विजयानंतर टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
इंग्लंड दौऱ्यापासून नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात होईल. यासाठी मे महिन्याच्या शेवटची संघाची निवड केली जाऊ शकते. जर कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्तीचा निर्णय घेतला, तर भारतीय कसोटी संघात मोठा बदल पाहायला मिळेल.
विराट कोहलीसाठी 2024-25 चा कसोटी हंगाम फारसा चांगला नव्हता. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेत त्याला सातत्य राखण्यासाठी संघर्ष करावा लागला. कोहलीने 5 कसोटी सामन्यांत केवळ 190 धावा केल्या. मालिकेतील पहिल्या पर्थ कसोटीत शतक झळकावल्यानंतर त्याला उर्वरित 4 सामन्यांत केवळ 85 धावा करता आल्या. या दौऱ्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 1-3 असा पराभव झाला होता. कोहलीने आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळले असून 30 शतकांसह 9,230 धावा केल्या आहेत.