Divya Deshmukh: महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपची विजेती ठरलेली दिव्या देशमुख कोण आहे? जाणून घ्या

Who is Divya Deshmukh

Who is Divya Deshmukh: नागपूरच्या 19 वर्षांच्या दिव्या देशमुखने (Divya Deshmukh) फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 (FIDE Women’s Chess World Cup) जिंकत क्रीडाजगतात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत तिने अनुभवी कोनेरू हम्पीचा पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यासह दिव्या ही विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

टाय-ब्रेकमध्ये हम्पीवर मात करत इतिहास घडवला

दिव्या आणि कोनेरु हम्पी यांच्यातील अंतिम सामना अतिशय अटीतटीचा होता. रविवारी क्लासिकल फेरी अनिर्णित राहिल्यानंतर सामना टाय-ब्रेकमध्ये गेला. पहिला रॅपिड गेम बरोबरीत राहिला, पण दुसऱ्या गेममध्ये वेळेच्या मर्यादेमुळे हम्पीकडून झालेल्या चुका दिव्याने अचूक ओळखून फायदा घेतला. अखेर 1.5-0.5 अशा फरकाने तिने टाय-ब्रेक जिंकला.

या विजयामुळे दिव्या देशमुख ही भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे. विशेष म्हणजे ती भारताची एकूण 88वी ग्रँडमास्टर आहे.

कोण आहे दिव्या देशमुख? (Who is Divya Deshmuk)

दिव्याचा जन्म 9 डिसेंबर 2005 रोजी नागपुरात झाला. तिचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता दोघेही डॉक्टर असून, अवघ्या 5 वर्षांपासून तिने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. 2012 मध्ये अंडर-7 राष्ट्रीय विजेतेपद मिळवून तिने पहिल्याच प्रयत्नात नाव कमावले. त्यानंतर 2014 मध्ये डरबनमध्ये अंडर-10 आणि 2017 मध्ये ब्राझीलमध्ये अंडर-12 गटात तिने जागतिक विजेतेपदे जिंकली.

दिव्याने 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टरचा किताब जिंकला. पुढील वर्षी तिने अंडर-20 विश्वविजेतेपदही मिळवले. 11 पैकी 10 गुण मिळवत तिने स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. याशिवाय 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिची भूमिका महत्त्वाची ठरली.

2024 मध्ये लंडनमध्ये झालेल्या फिडे वर्ल्ड ब्लिट्झ टीम चॅम्पियनशिपमध्ये तिने चीनच्या अव्वल खेळाडू होउ यिफानला हरवून मोठा धक्का दिला. याच कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिचे जाहीर कौतुक केले होते. ऑलिम्पियाडमध्ये तीन सुवर्णपदके, अनेक आशियाई आणि विश्व युवा विजेतेपदे दिव्याने पटकावली आहेत. सध्या ती चेन्नईतील आर. बी. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे प्रशिक्षण घेत आहे.

दिव्याच्या या यशामुळे तिच्या कार्यकौशल्याची आणि धैर्याची देशभरात चर्चा होत असून, तिच्या भविष्यातील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.