Wimbledon 2025: सिनरने अल्काराझचा उडवला धुव्वा! फ्रेंच ओपनचा बदला घेत विम्बल्डन विजेतेपद पटकावले

Wimbledon 2025 Winner

Wimbledon 2025 Winner | विम्बल्डन 2025 (Wimbledon 2025) पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जनिक सिनरने (Jannik Sinner) कार्लोस अल्काराझवर (Carlos Alcaraz) मात करत विजेतेपदावर नाव कोरले. लंडनमधील ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबवर झालेल्या या लढतीत सिनरने 4-6, 6-4, 6-4, 6-4 अशसा विजय मिळवला. फ्रेंच ओपनमधील पराभवाचा बदला घेत त्याने चौथे ग्रँड स्लॅम आणि विम्बल्डनचे पहिले विजेतेपद पटकावले.

सामन्याचा थरार

अल्काराझने दमदार सुरुवात करत पहिला सेट 45 मिनिटांत जिंकला, सिनरच्या सर्व्हिसवर मात करत सर्व्ह-अँड-व्हॉली रणनीतीचा वापर केला. पण सिनरने दुसऱ्या सेटपासून शांतपणे पुनरागमन केले. त्याने अल्काराझच्या प्रत्येक शॉटला जोरदार प्रत्युत्तर दिले.23 वर्षीय सिनरने अल्काराझच्या सलग विजयांच्या मालिकेला ब्रेक लावला.

विजेत्यांना मिळालेली बक्षीस रक्कम

विम्बल्डन विजेत्या व उपविजेत्या दोघांना प्रचंड मोठी बक्षिसाची रक्कम मिळाली आहे. विजेत्या सिनरला £3,000,000 (सुमारे $4.05 दशलक्ष) आणि 2,000 एटीपी पॉइंट्स मिळाले, तर अल्काराझला £1,520,000 (सुमारे $2.05 दशलक्ष) आणि 1,300 पॉइंट्स देण्यात आले. यंदाचा एकूण बक्षीस निधी £53.5 दशलक्ष होता, जो गतवर्षीच्या तुलनेत 8% जास्त आहे.

अल्काराझची मालिका खंडित

अल्काराझने मागील पाच हेड-टू-हेड सामन्यांत सिनरवर वर्चस्व गाजवले होते, ज्यात फ्रेंच ओपनच्या पाच-सेटच्या लढतीचा समावेश होता. त्या सामन्यात सिनरने दोन सेट आणि तीन मॅच पॉइंट्स गमावले होते. पण विम्बल्डनमध्ये त्याने अल्काराझची 24-सामन्यांची अजिंक्य मालिका आणि सलग 20 विजयांची लय मोडत विजय मिळवला.