वेदिका मांगेला – Arattai vs WhatsApp: भारतातील डिजिटल क्षेत्र गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित होत आहे. सोशल मीडिया (Social media) आणि मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून संवादाच्या मार्गात अनेक बदल झाले आहेत. या सर्व क्षेत्रात अद्यापपर्यंत परदेशी कंपन्यांचे वर्चस्व होते. अशा परिस्थितीत भारतीय वापरकर्त्यांसाठी झोहो (Zoho) या कंपनीने तयार केलेले आराटाई हे पूर्णपणे स्वदेशी ॲप आता हळूहळू लोकप्रिय होऊ लागले आहे. हे खऱ्या अर्थाने डिजिटल स्वावलंबनाचे प्रतिक ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिल्यापासून झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि सीईओ श्रीधर वेम्बू यांनी विकसित केलेले हे ॲप चर्चेचा विषय बनले आहे.
झोहो ही भारतीय सॉफ्टवेअर कंपनी असून तिच्या विविध सेवा जगभरात लोकप्रिय आहेत. पण आराटाईच्या (Arattai) माध्यमातून झोहोने भारतीयांसाठी एक असा पर्याय उपलब्ध करून दिला आहे जो व्हॉट्सॲप (WhatsApp)सारख्याच सर्व सुविधा देतो आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे वापरकर्त्यांची माहिती भारतातच सुरक्षित ठेवतो. या ॲपला केंद्र सरकारकडून पाठिंबा मिळाल्यानंतर लोकांचा त्यावरचा विश्वास अधिक वाढला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः हे ॲप वापरून नागरिकांना स्वदेशी अॅप वापरण्याचे आवाहन केले.
आराटाईचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा साधेपणा आणि वेग. हे ॲप कमी क्षमतेच्या मोबाईल फोनवरही सहज चालते. शिवाय एकाच वेळी ते पाच उपकरणांवर वापरता येते. मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट आणि अगदी अँड्रॉइड टीव्हीवर सुद्धा ते वापरता येते. पॉकेट या फोल्डरमध्ये वापरकर्ते त्यांचे फोटो, व्हिडिओ, नोट्स किंवा आठवणी सुरक्षित ठेवू शकतात, तर मिटिंग या फीचरमधून थेट व्हिडिओ कॉन्फरन्स घेता येतात. त्यामुळे झूम किंवा गुगल मिटसारख्या सेवांना आराटाईचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीनेही आराटाई विशेष लक्ष वेधून घेते. या ॲपमध्ये कोणत्याही प्रकारच्या जाहिराती नाहीत. वापरकर्त्यांचा सर्व डेटा भारतातील सर्व्हरवरच साठवला जातो. कॉल्ससाठी एंड-टू-एंड एनक्रिप्शन आधीपासूनच उपलब्ध आहे आणि लवकरच टेक्स्ट संदेशांसाठीही सुविधा आणली जाणार आहे.
आजच्या काळात, जेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय ॲप वापरकर्त्यांचा डेटा मार्केटिंगसाठी वापरतात किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्यांचे विश्लेषण करतात, तेव्हा आराटाईचा हा जाहिरातमुक्त आणि गोपनीयता राखणारा पर्याय भारतीय वापरकर्त्यांसाठी आश्वासक ठरतो.
आराटाईच्या लोकप्रियतेचा वेग पाहिला तर तो अविश्वसनीय आहे. हा ॲप २०२१ मध्येच सुरू झाला होता. मात्र आता स्वदेशीचा नारा दिल्यानंतर केवळ तीन दिवसांत या ॲपच्या वापरकर्त्यांची संख्या ३,००० वरून तब्बल ३,५०,००० वर पोहोचली आहे . झोहोच्या तांत्रिक टीमने रात्रंदिवस मेहनत करून सर्व्हर क्षमता वाढवली, जेणेकरून वाढत्या वापरकर्त्यांच्या मागणीला तोंड देता येईल. ही वेगाने वाढलेली लोकप्रियता भारतीय जनतेचा आत्मविश्वास दर्शवते की आता आपल्याला परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
आराटाई फक्त मेसेजिंगसाठी नाही, तर सामाजिक आणि आर्थिक स्वावलंबनासाठीही एक पाऊल आहे. झोहोसारख्या भारतीय कंपनीने जगभरात स्पर्धा करताना भारतीय मूल्य आणि गोपनीयतेला प्राधान्य दिले आहे. यामुळे भारताच्या डिजिटल सार्वभौमत्वाला बळकटी मिळते आहे. भविष्यात जर या अॅपमध्ये सर्व संदेशांसाठी संपूर्ण सुरक्षा आणि अधिक सुधारित फीचर्स आले, तर आराटाई निश्चितच व्हॉट्सॲपसारख्या जागतिक अॅपला तगडी स्पर्धा देईल.
झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू हे या संकल्पनेमागील प्रेरणास्त्रोत आहेत. तामिळनाडूतील तेंकासी गावात राहणारे आणि साधेपणाने जगणारे हे उद्योगपती ग्रामीण भारतात तंत्रज्ञान आणणारे म्हणून ओळखले जातात. आयआयटी मद्रास आणि प्रिन्सटन विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले वेम्बू यांनी अमेरिकेतील करिअर सोडून भारतात परत येऊन झोहोची स्थापना केली. त्यांनी झोहो स्कूल ऑफ लर्निंगच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा उद्देश फक्त तंत्रज्ञान निर्माण करणे नव्हे, तर तंत्रज्ञानाद्वारे समाजात परिवर्तन घडवणे हा आहे.
याआधी असाच एक प्रयोग ट्विटर म्हणजेच एक्सला भारतीय पर्याय म्हणून कू अॅपही २०२१ मध्ये खूप गाजावाजा करत लाँच झालेले. पण पुढे ते फारसे गाजले नाही.
हे देखील वाचा –
बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत ! 6, 11 नोव्हेंबरला मतदान! 14 ला निकाल