Airless Tyres : वाहतूक क्षेत्रात सध्या वेगाने बदल होत आहेत आणि टायरची रचनाही त्याला अपवाद नाही. आतापर्यंत आपण केवळ हवा असलेले (ट्यूब आणि ट्यूबलैस) टायर्स वापरले. परंतु, आता सुरक्षितता, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि कमी देखभाल ही प्राधान्ये ठरल्याने एअरलेस टायर्स (Airless Tyres) नावाचे एक नवीन प्रगत तंत्रज्ञान बाजारात येत आहे.
या टायर्सना हवेची गरजच नसल्यामुळे बाईक असो वा कार, हे टायर्स वाहनाचे वजन उत्तम प्रकारे पेलतात आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करतात.
एअरलेस टायर्सचा नेमका अर्थ काय?
एअरलेस टायर्स म्हणजे असे टायर, ज्यात हवा भरण्याची गरज नसते. त्यामुळे पंक्चर होण्याची, हवेचा दाब तपासण्याची किंवा टायर अचानक फुटण्याची भीती पूर्णपणे संपते. हवेऐवजी, या टायर्समध्ये खास प्रकारच्या डिझाइनचे रबर स्पोक्स आणि बेल्ट्सचा वापर केला जातो.
हे स्पोक्स टायरला आवश्यक असलेला आकार, ताकद आणि आधार देतात. यामुळे टायर खराब होण्याची किंवा पंक्चर होण्याची चिंता पूर्णपणे दूर होते.
या टायर्सची आतील रचना बाहेरून सहज दिसते, ज्यामुळे त्यांना एक आकर्षक, मॉडर्न स्वरूप मिळते. हे टायर देखभाल-मुक्त असल्यामुळे लांबच्या प्रवासासाठी आणि खराब, खडबडीत रस्त्यांवर ड्रायव्हिंग करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.
किंमत आणि काही नकारात्मक बाजू
सध्याच्या बाजारपेठेत एअरलेस टायर्सची किंमत, कंपनी आणि आकारमानानुसार, सुमारे 10,000 रुपये ते 20,000 रुपयांदरम्यान आहे. या तुलनेत, ट्यूबलैस टायर्स साधारणपणे 1,500 रुपये ते 60,000 रुपयांपर्यंत उपलब्ध असतात. म्हणजेच, एअरलेस टायर्स सध्याच्या टायर्सपेक्षा निश्चितच जास्त किमतीचे आहेत, पण उत्पादन वाढल्यास ही किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
एअरलेस टायर्सचे काही तोटे:
आवाज आणि कंपन: रस्त्याशी सततच्या घर्षणाने टायरचा आवाज आणि कंपन जास्त असू शकते. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये इंजिनचा आवाज नसल्याने हा आवाज अधिक स्पष्टपणे जाणवतो.
ड्रायव्हिंगचा अनुभव: हे टायर्स खूप मजबूत असल्याने, खराब रस्त्यांवरील धक्के पूर्णपणे शोषले जात नाहीत, ज्यामुळे गाडी चालवताना जास्त धक्के जाणवू शकतात.
मायलेज आणि रेंज: या टायर्सचा रस्त्याशी संपर्क जास्त असल्याने, गाडीला पुढे ढकलण्यासाठी अधिक ताकद लागते. याचा परिणाम इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी लाईफवर होतो आणि मायलेज कमी होते. पेट्रोल/डिझेल वाहनांमध्येही इंधन वापर वाढू शकतो.









