Apple Price Hike: प्रीमियम गॅजेट्स वापरणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी अॅपल कंपनीकडून एक अत्यंत धक्कादायक बातमी आली आहे. अॅपलने भारतातील आपल्या लोकप्रिय मॅकबुक (MacBook) आणि आयपॅड (iPad) या दोन्ही सेगमेंटच्या किमतीत एकाच वेळी प्रचंड मोठी वाढ केली आहे.
काही ठराविक मॉडेल्सच्या किमतीत तर थेट 1,00,000 रुपयांपर्यंतची अवाढव्य वाढ पाहायला मिळत आहे. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी काही दिवसांपूर्वीच जागतिक बाजारातील परिस्थिती पाहता किमती वाढवणे अपरिहार्य असल्याचे संकेत दिले होते, ज्याची अंमलबजावणी आता भारतात झाली आहे.
जागतिक पुरवठा साखळीमध्ये मेमरी मॉड्यूल्स म्हणजेच रॅम आणि स्टोरेज बनवण्यासाठी लागणारा खर्च कमालीचा वाढला आहे. याचा थेट फटका उत्पादनाला बसत असल्याने अॅपलने वाढीव खर्चाचा भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपलच्या इंडिया अधिकृत वेबसाईटवर या नवीन वाढीव किमती अपडेट देखील करण्यात आल्या आहेत.
मॅकबुक एअर आणि प्रो मॉडेल्स आता कितीला मिळणार? पाहा सुधारित दर:
कंपनीने बजेट लॅपटॉपपासून ते अगदी हाय-एंड प्रीमियम लॅपटॉपच्या किमतीत खालीलप्रमाणे बदल केले आहेत:
- MacBook Air 13-inch (M5): लाँचिंगच्या वेळी या लॅपटॉपची किंमत 1,19,900 रुपये होती. मात्र आता यात 30,000 रुपयांची वाढ झाली असून नवीन किंमत 1,49,900 रुपये झाली आहे.
- MacBook Air 15-inch: या मोठ्या व्हेरियंटची किंमत 1,44,900 रुपयांवरून थेट 35,000 रुपयांनी वाढवून आता 1,79,900 रुपये करण्यात आली आहे.
- MacBook Pro 14-inch (M5, 16GB RAM): व्यावसायिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या या मॉडेलवर तब्बल 70,000 रुपयांची वाढ झाली आहे. लाँचिंगला 1,69,900 रुपयांना मिळणारा हा लॅपटॉप आता 2,39,900 रुपयांना विकला जात आहे.
- MacBook Pro 14-inch (M5 Max): या सर्वात शक्तिशाली आणि महागड्या व्हेरियंटच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे तब्बल 1,00,000 रुपयांची रेकॉर्डतोड वाढ करण्यात आली आहे.
- MacBook Neo: विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या या सर्वात स्वस्त बजेट लॅपटॉपची किंमत देखील 10,000 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे पूर्वी 69,900 रुपयांना मिळणारे हे मॉडेल आता 79,900 रुपयांवर पोहोचले आहे.
आयपॅड सिरीजच्या किमतीतही मोठी वाढ; टॅब्लेट झाले महाग
लॅपटॉपप्रमाणेच अॅपलच्या आयपॅड श्रेणीलाही या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे:
- iPad Air 11-inch (M4): हा टॅब्लेट भारतात 64,900 रुपयांना लाँच करण्यात आला होता. आता यात 25,000 रुपयांची वाढ झाली असून याची नवीन किंमत 89,900 रुपये झाली आहे.
- iPad Pro (M5, 256GB): गेल्या वर्षी 99,990 रुपयांना सादर झालेल्या या प्रीमियम टॅब्लेटच्या किमतीत कंपनीने थेट 39,910 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता हा आयपॅड खरेदी करण्यासाठी तब्बल 1,39,900 रुपये मोजावे लागतील.
अचानक एवढी दरवाढ करण्याचे कारण काय? कंपनीने दिले उत्तर
या संपूर्ण विषयावर अॅपल कंपनीने अधिकृत भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, गॅजेट्ससाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या किमती इतक्या वेगाने आणि मोठ्या प्रमाणात वाढतील अशी अपेक्षा नव्हती. आम्ही बऱ्याच काळापासून हा वाढीव खर्च स्वतः सोसून ग्राहकांना सुरक्षित ठेवले होते. मात्र, आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे नाईलाजाने आम्हाला मॅक आणि आयपॅडच्या किमती वाढवाव्या लागत आहेत.










