Arijit Singh : भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय आवाज आणि कोट्यवधी तरुणांच्या हृदयावर राज्य करणारा गायक अरिजीत सिंह याने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अरिजीतने चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनातून (प्लेबॅक सिंगिंग) निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण संगीत विश्वात खळबळ उडाली आहे.
नेमकी घोषणा काय?
अरिजीतने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार मानताना म्हटले आहे की, “इतकी वर्षे मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की, आता मी नवीन प्लेबॅक सिंगिंगचे कोणतेही काम स्वीकारणार नाही. मी माझा हा प्रवास इथेच थांबवत आहे.”
गाणे पूर्णपणे सोडणार नाही
अरिजीतने जरी चित्रपटांसाठी गाणे थांबवले असले, तरी त्याने संगीत निर्मिती पूर्णपणे सोडलेली नाही. त्याने सोशल मीडियावर स्पष्ट केले की, तो एक स्वतंत्र कलाकार म्हणून संगीत बनवणे सुरूच ठेवणार आहे. तसेच, त्याने आधीच स्वीकारलेले सर्व प्रोजेक्ट तो पूर्ण करणार आहे. त्यामुळे या वर्षात चाहत्यांना त्याचे काही नवीन चित्रपट गीते ऐकायला मिळतील.
रिअॅलिटी शोपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास
अरिजीत सिंहने आपल्या करिअरची सुरुवात ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोमधून केली होती. तिथे त्याला यश मिळाले नाही, तरी त्याने हार मानली नाही. ‘आशिकी 2’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ हे गाणे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरले.
- त्याने आतापर्यंत 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
- हिंदीसह बंगाली, तमिळ, तेलुगू आणि मराठी भाषेतही त्याने आपली जादू पसरवली आहे.
- त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
- स्पोटिफाय आणि यूट्यूबवर तो जगातील सर्वाधिक ऐकला जाणारा भारतीय कलाकार आहे.
38 वर्षीय अरिजीतने अत्यंत संघर्षातून हे स्थान मिळवले आहे. आज प्रत्येक चित्रपटात त्याची एकतरी गाणे असावे, अशी निर्मात्यांची इच्छा असते. अशा शिखरावर असताना त्याने नवीन प्रोजेक्ट्स नाकारल्यामुळे चाहते भावूक झाले आहेत. मात्र, स्वतंत्र संगीताच्या माध्यमातून तो आपल्याशी जोडून राहील, अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे.









