Asia’s Best Restaurants: भारतीय जेवण म्हणजे केवळ मसालेदार पदार्थ आणि रस्सा, हा समज आता इतिहासजमा झाला आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीमधील विविधता आता खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर ओळखली जात आहे.
‘आशियातील 50 सर्वोत्तम रेस्टॉरंट्स 2026’ या प्रतिष्ठित स्पर्धेची विस्तारित यादी (51 ते 100 रँकिंग) नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये भारतातील 4 दिग्गज रेस्टॉरंट्सनी आपले स्थान निश्चित केले आहे.
दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू या शहरांमधील या रेस्टॉरंट्सनी आपल्या वेगळ्या चवीने आणि संकल्पनेने परीक्षकांना भुरळ घातली आहे. मुख्य ‘टॉप 50’ ची यादी 25 मार्च रोजी हाँगकाँगमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात जाहीर केली जाईल, पण त्याआधी या 4 अभिमानास्पद नावांवर नजर टाकूया:
1. पापाज् (Papa’s), मुंबई – 66 वे स्थान
या स्पर्धेत पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्या ‘पापाज्’ने थेट 66 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. केवळ 12 जण बसू शकतील अशा या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये शेफ हुसेन शहजाद भारतीय चवींना एक नवीन आणि मजेशीर ट्विस्ट देतात. येथे टेबल मिळवणे हे सध्या मुंबईतील खवय्यांसाठी मोठ्या प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.
2. द टेबल (The Table), मुंबई – 73 वे स्थान
मुंबईकरांचे दीर्घकाळापासून आवडते असलेले ‘द टेबल’ या यादीत 73 व्या क्रमांकावर आहे. जगभरातील विविध पदार्थांची मेजवानी आणि येथील खास पेये ग्राहकांना वारंवार येथे येण्यास भाग पाडतात.
3. इन्जा (Inja), दिल्ली – 75 वे स्थान
देशाच्या राजधानीत असलेले हे रेस्टॉरंट भारतीय आणि जपानी खाद्यसंस्कृतीचा मिलाफ करणारे पहिलेच ठिकाण मानले जाते. शेफ अद्वैत अनंतवार यांनी तयार केलेले ‘शिझो लीफ टुना’ आणि ‘लॉबस्टर रसम’ सारखे पदार्थ येथे येणाऱ्या पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत.
4. फार्मलोअर (Farmlore), बंगळुरू – 83 वे स्थान
बंगळुरूच्या ‘फार्मलोअर’ने 83 वे स्थान पटकावले आहे. शेफ जॉन्सन एबेनेझर आणि कौशिक राजू यांनी सुरू केलेले हे रेस्टॉरंट पूर्णपणे शेतातील ताज्या उत्पादनांवर आधारित आहे. ऋतूंनुसार बदलणारा मेनू आणि स्थानिक साहित्याचा वापर ही येथील मोठी वैशिष्ट्ये आहेत.
भारतीय खाद्यक्षेत्राची ही बदलती प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावत आहे. आता सर्वांचे लक्ष 25 मार्चकडे लागले आहे, जेव्हा आशियातील सर्वोत्तम 50 हॉटेल्सची नावे जगासमोर येतील.










