Home / लेख / RPI : बाबासाहेबांचं नाव… विचारांचा वारसा…मात्र, विखुरलेलीच आरपीआय! शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!

RPI : बाबासाहेबांचं नाव… विचारांचा वारसा…मात्र, विखुरलेलीच आरपीआय! शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!

तुळशीदास भोईटे (सल्लागार संपादक) –RPI – भारताचे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी सांगितलेला हा मार्ग आहे. बाबासाहेबांनी...

By: Team Navakal
Dr. Babasaheb Ambedkar

तुळशीदास भोईटे (सल्लागार संपादक) –RPI – भारताचे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी सांगितलेला हा मार्ग आहे. बाबासाहेबांनी जे दिलं त्यात सर्वात मोठं आहे ते संविधान आणि माणसासारखं सन्मानानं जगण्याचा हक्क. त्यांनी तळागाळातील प्रत्येकाचा विचार केला. शिक्षणामुळे कसं जीवन बदलतं हे स्वत:च्या शिक्षणातून (Educate)आणि विद्वतेतून दाखवून दिलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा मंत्र. पण तो मंत्र त्यांचं नाव समोर ठेवत, वैचारिक वारशाचा दाखला देत चाललेले पक्षच विसरले की, काय अशी स्थिती आहे. मात्र महाराष्ट्रात त्यांच्या विचारांनी राजकारणाचा दावा करणाऱ्यांमध्येच मोठं विखुरलंपण दिसत असतं. खुपावे इतकं.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देश इंग्रजी गुलामीत (Under British rule)असताना 1935 मध्ये मजूर पक्षाची स्थापना केली. हा पहिला पक्ष कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म, समूहासाठी नाही, तर कष्टकऱ्यांचा होता, हे नावातून मांडलं जात होतं. मजूर पक्षाकडून ते मुंबई प्रांतात निवडूनही (Mumbai Legislative Assembly) आले होते. या पक्षाने 1937 च्या प्रांतीय निवडणुकांमध्ये 17 जागा लढवल्या. त्यापैकी 14 जागांवर मजूर पक्षाचे उमेदवार निवडून आले. मजूर पक्षाच्या विजयी उमेदवारांमध्ये केवळ अनुसूचित जातींचे (Scheduled Castes Federation) नव्हते तर इतर जातींमधील शामराव परुळेकर, भाऊसाहेब राऊत असेही नेते होते. बाबासाहेबांच्या पहिल्याच पक्षाला मिळालेले हे यश मोठेच होते. 1942मध्ये त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन केला. त्याचा फायदाच झाला. संविधानाच्या माध्यमातून त्यांना केवळ वंचित घटकच नाही, तर देशातील प्रत्येक माणसासाठी खूप काही करता आलं. समानतेची हमी देता आली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) पक्षाची स्थापना करण्यात आली. बाबासाहेबांच्या विचारांनुसार स्थापन झालेला हा पक्ष राष्ट्रीय होता! स्थापनेनंतरचे रिपाइचे पहिले अध्यक्ष तामिळनाडू राज्यातील नेते एन. शिवराज (N. Shivraj) हे होते. पहिली 10 – 15 वर्षे रिपाइ जबरदस्त काम करणारा पक्ष होता. देशभरात पक्षाचे 13 खासदार, 22 आमदार निवडून आले होते. परंतु या भरभराटीनंतर फुटीचं ग्रहण लागलं. नेत्यांमधील मतभेद मनभेदांपर्यंत वाढले. प्रत्येक नेत्यानं आपली वेगळी राहुटी उभारली. त्यातूनच त्याकाळात महाराष्ट्रात खोब्रागडे गट (Khobragade), कांबळे गट (Kamble), गवई गट (Gavai) असे रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट उभे राहिले.


सत्तरच्या दशकात प्रस्थापित रिपाइ नेत्यांविरोधात आंबेडकरी चळवळीत बंडाचा एल्गार झाला. नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) यांनी 9 जुलै 1972 रोजी दलित पँथरची (Dalit Panthers) स्थापन केली. राजा ढाले (Raja Dhale) यांनीही पँथर स्थापन केल्याचा दावा केला. पँथरने आक्रमक वाटचाल सुरू केली. याचा फटका रिपाइ पक्षाला बसलाच. मधल्या काळात 1996 मध्ये आंबेडकरी चळवळीतील तरुणांच्या रेट्यामुळे सर्व प्रस्थापित आंबेडकरी नेत्यांना एकत्र यावं लागलं. त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावानंच निवडणूक लढवली. मात्र सतरा जागी लढलेल्या रिपाइला एकही जागा जिंकता आली नाही. पण 4.9 टक्के मते मिळाली होती. रिपब्लिकन एकजुटीची ही ताकद शरद पवारांनी ओळखली. 1998च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि रिपाइची युती (Congress-RPI alliance)घडवली. काँग्रेसने रिपाईला चार जागा दिल्या. त्यावेळी अमरावतीतून रा. सु. गवई (R.S. Gavai,), अकोल्यातून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), चिमूरमधून प्रा. जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) आणि ईशान्य मुंबईतून रामदास आठवले (Ramdas Athawale) असे चार खासदार निवडून आले. पण पुढे हे ऐक्य मतभेदांच्या खडकावर फुटले.

पुढील काळात रामदास आठवलेंची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) RPI (A) पुढे आली. आंबेडकरी चळवळीच्या राजकारणात रामदास आठवले मोठे होत गेले. सत्तेतही गेले. पुढे ते मोदींचा उदय होताच भाजपासोबत (Bharatiya Republican Party) गेले. तेव्हापासून ते राज्यसभेचे खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री आहेत.

एकीकडे रामदास आठवले हे प्रस्थापित राजकीय पक्षांसोबत राजकारण करत असतानाच दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आधी भारतीय रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून आणि नंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय राहिले. त्यांनी रिपब्लिकन पार्टीला एकजातीय, एकधर्मीय स्वरुप येऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले. भारिप बहुजन महासंघ हा त्यातूनच साकारला. त्या काळातच मखराम पवारांना निवडून आणणारा किनवट पॅटर्नही गाजला. आता वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माध्यमातूनही ते सक्रिय आहेत. वंचितचा प्रयोग हा 2019च्या निवडणुकीत खूपच चर्चेत आला होता. बाळासाहेब आंबेडकरांना मिळणारं जनसमर्थन एखाद्या लाटेसारखं उसळताना दिसत होतं. पण पुढे ते सातत्य राहिलं नाही.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाचा विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघात चांगला प्रभाव होता. उगवत्या सुर्यावर रा. सु. गवई लढत असत.  त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पहिले केंद्रीय कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विरोधात 1962मध्ये निवडणूकही लढवली होती. खूप कमी फरकाने ते पराभूत झाले. त्यानंतर 1967मध्येही ते लढले. त्यानंतर मात्र रा. सु. गवई हे सतत 30 वर्षे विधान परिषदेचे आमदार होते. त्यांनी विरोधी पक्षनेता, उपसभापती, सभापती अशी अनेक पदंही भूषवली. रा. सु. गवई 1996पासून केंद्रीय राजकारणात सक्रिय झाले. पुढे त्यांना बिहार, केरळचे राज्यपाल म्हणून जबाबदारी मिळाली. त्यांचे सुपुत्र राजेंद्र गवई यांनी त्यांची राजकीय परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना वडिलांसारखे यश मिळाले नाही. त्यांचे दुसरे सुपुत्र भूषण हे सध्या देशाचे सरन्यायाधीश (Chief Justice of India Bhushan Gavai) आहेत.


 प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष विदर्भात अस्तित्व राखून आहे. मधल्या काळातील त्यांची भाजपाशी झालेली जवळीक आंबेडकरी चळवळीतील (Ambedkarite supporters)मोठ्या वर्गाला पसंत नसल्याचं जाहीर कार्यक्रमातील विरोधावरून दिसून आले. गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील दीपक केदार हा तरुण नेता आक्रमकतेनं सक्रिय झाला आहे. त्यांची ऑल इंडिया पँथर सेना (India Panther Sena)सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आंबेडकरी विचारांनुसार आक्रमक असते. सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीनंतर सर्वात सक्रिय तेच दिसतात.


रामदास आठवले यांनी मुलाखत देताना स्पष्टपणे सांगितले, फक्त आमच्या मतांवर आमचा एक आमदारही निवडून येणार नाही. इतर समाजघटकांची मतंही लागतील. त्यासाठीच युती आघाडी करावी लागते, 1996ला एकीकृत रिपब्लिकन पार्टीला 4.9 टक्के मते मिळाली होती. पण जागा एकही आली नव्हती. जर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा सर्वसमावेशक पक्ष आजही आकारास आला तर मात्र बाबासाहेबांच्या पहिल्या मजूर पक्षाला जसं यश मिळालं होतं, तसं मोठं यश मिळवणं शक्य होईल. पण सर्वसमावेशकतेप्रमाणेच संघटित होणंही महत्त्वाचंच आणि मेख तिथंच आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सर्वच राजकारणी सांगतात. पण अंमलात कोण आणतं? संघटित होण्याऐवजी विखुरलेले राहणच घात करते.


नवरात्रीचे ‌‘राजकीय‌‘ रंग
नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्रात पंचायत ते पालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. हे लक्षात घेऊनच आम्ही वाचकांसाठी  महाराष्ट्रात अग्रणी असलेल्या राजकीय पक्षांचा इतिहास नऊ दिवस नवरात्रीचा नजराणा म्हणून सादर करीत आहोत.


हे देखील वाचा –

बविआ, जनसुराज्यसारख्या पक्षांचे जिल्हा राजकारणावरच लक्ष!

नवरात्रीचे राजकीय नवरंग ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमाचे राजकारण

नवरात्रीचे राजकीय’ रंग !  शिवसेना: रंग भगवाच, पण कशा बदलणार छटा?

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या