Memory Boost Tips: निरोगी आणि चपळ शरीर राखण्यासाठी नियमित व्यायाम हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. व्यायामामुळे जीवनशैलीशी संबंधित अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. मात्र, व्यायामाचे फायदे केवळ शारीरिक आरोग्यापुरते मर्यादित नसून, त्याचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम आपल्या मेंदूवर होतो.
नियमित सक्रिय राहिल्याने आपली तर्कशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि विशेषतः स्मरणशक्ती कमालीची सुधारते.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सर्वात उत्तम व्यायाम कोणता?
व्यायामाचे अनेक प्रकार असले तरी, मेंदूच्या आरोग्यासाठी व्यायामाची तीव्रता खूप महत्त्वाची असते. एका ताज्या संशोधनानुसार, ‘हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग’ म्हणजेच HIIT हा प्रकार स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी सर्वात फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. ‘एजिंग अँड डिसीज’ या शोधनिबंधात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, उच्च तीव्रतेचा व्यायाम वृद्धांमध्येही मेंदूची कार्यक्षमता वाढवू शकतो.
संशोधनातून काय समोर आले?
संशोधकांनी ६५ ते ८५ वयोगटातील व्यक्तींवर सहा महिने अभ्यास केला. यामध्ये सहभागी झालेल्यांचे तीन गट करण्यात आले होते:
- कमी तीव्रतेचा व्यायाम करणारा गट
- मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणारा गट
- उच्च तीव्रतेचा (HIIT) व्यायाम करणारा गट
सहा महिन्यांनंतर असे दिसून आले की, ज्यांनी ‘हाय इंटेन्सिटी’ व्यायाम केला होता, त्यांच्या मेंदूच्या ‘हिप्पोकॅम्पस’ या भागाची कार्यक्षमता वाढली होती. हा भाग प्रामुख्याने आठवणी साठवण्यासाठी आणि शिकण्यासाठी जबाबदार असतो.
कसा करावा हा व्यायाम?
‘हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग’ म्हणजे कमी वेळात अत्यंत वेगाने केले जाणारे व्यायाम. यामध्ये खालील प्रकारांचा समावेश होतो:
- वेगाने धावणे (Sprints)
- दोरीवरच्या उड्या मारणे
- जंप स्कॉट्स
- माऊंटन क्लाइंबर्स
हे व्यायाम केल्याने मेंदूच्या पेशींची वाढ होते आणि त्यांच्यातील परस्पर संबंध अधिक मजबूत होतात. तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून केवळ ३ वेळा आणि सलग सहा महिने हे व्यायाम केल्यास मेंदूचे आरोग्य सुधारते आणि त्याचे फायदे पुढील ५ वर्षांपर्यंत टिकून राहू शकतात.
हे देखील वाचा – Zomato Price Hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोने पुन्हा वाढवले ‘प्लॅटफॉर्म शुल्क’; आता प्रत्येक ऑर्डरसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे










