Weight Loss Recipes: भारतीय स्वयंपाकघरात पनीर हे प्रथिनांचा सर्वात उत्तम स्रोत मानले जाते. प्रति 100 ग्रॅम पनीरमधून जवळपास 28 ग्रॅम दर्जेदार प्रथिने मिळतात, जे इतर दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेत अधिक आहेत. प्रथिनांमुळे भूक कमी लागते, स्नायूंचे आरोग्य सुधारते आणि मेटाबॉलिजम वेगवान होण्यास मदत होते.
अभ्यासानुसार, उच्च प्रथिनेयुक्त आहार वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतो. मास्टरशेफ इंडिया सीझन 8 ची स्पर्धक शेफ कृती धिमान यांनी वजन कमी करण्यासाठी पनीरच्या काही खास आणि चविष्ट रेसिपीज शेअर केल्या आहेत.
1. तंदुरी पनीर टॅकोज (कॅलरी: 220–250)
हे टॅकोज बनवण्यासाठी पिठाऐवजी वाफवलेल्या कोबीच्या पानांचा वापर केला जातो, ज्यामुळे कॅलरी कमी होतात.
- साहित्य: 100 ग्रॅम लो-फॅट पनीर, 2 चमचे घट्ट दही, आले-लसूण पेस्ट, कश्मीरी लाल तिखट, हळद, जिरे पूड, गरम मसाला आणि अर्धा चमचा तेल.
- कृती: पनीर दह्यामध्ये सर्व मसाले लावून 20 मिनिटे मॅरीनेट करा. नॉन-स्टिक तव्यावर अगदी कमी तेलात पनीर भाजून घ्या. आता वाफवलेल्या कोबीच्या पानामध्ये हे पनीर, कांदा, टोमॅटो आणि हिरवी चटणी घालून सर्व्ह करा.
2. पनीर ओट्स चिल्ला (कॅलरी: 220–240)
नाश्त्यासाठी हा एक उत्तम आणि पोटभरीचा पर्याय आहे.
- साहित्य: अर्धा कप ओट्स पावडर, 100 ग्रॅम किसलेले पनीर, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद आणि मीठ.
- कृती: ओट्सच्या पिठात पनीर आणि सर्व भाज्या-मसाले मिसळून मध्यम घट्ट पीठ तयार करा. तव्याला थोडे तेल लावून त्यावर हे पीठ पसरवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
3. पनीर पेपर फ्राय (कॅलरी: 210–230)
रात्रीच्या जेवणासाठी सॅलडसोबत हा हलका आहार घेऊ शकता.
- साहित्य: 100 ग्रॅम पनीरचे तुकडे, 1 छोटा कांदा, 1 चमचा काळी मिरी पूड, कढीपत्ता, आले-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस.
- कृती: पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून कढीपत्ता आणि आले-लसूण पेस्ट परता. त्यात कांदा घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा. आता पनीर, हळद, मीठ आणि काळी मिरी पूड घालून 3 मिनिटे परता. शेवटी लिंबू पिळून सर्व्ह करा.
4. पनीर चिली ब्रुशेटा (कॅलरी: 200–220)
मल्टीग्रेन किंवा ओट्स ब्रेडचा वापर करून तुम्ही हे हेल्दी स्नॅक्स बनवू शकता.
- साहित्य: 100 ग्रॅम कुस्करलेले पनीर, कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि कोथिंबीर.
- कृती: पॅनमध्ये कांदा-टोमॅटो परतून त्यात पनीर, मसाले आणि सॉस घाला. हे मिश्रण व्यवस्थित शिजल्यावर ब्रेडच्या स्लाईसवर ठेवून त्याचा आनंद घ्या.
5. क्रीमी पेस्टो पनीर (कॅलरी: 220–240)
इटालियन चव आवडणाऱ्यांसाठी ही रेसिपी उत्तम आहे.
- साहित्य: 100 ग्रॅम पनीर, 1 कप तुळशीची पाने (बेसिल), भिजवलेले बदाम किंवा अक्रोड, लसूण, काळी मिरी आणि ऑलिव्ह ऑइल.
- कृती: तुळशीची पाने, सुका मेवा, लसूण आणि लिंबाचा रस एकत्र वाटून पेस्टो सॉस तयार करा. पॅनमध्ये पनीर हलके गरम करा आणि त्यात हा तयार सॉस मिसळा. थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी नीट करा आणि गरमागरम खा.









