Protein Rich Dal: शरीराला बळकटी देण्यासाठी, स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि दिवसभर उत्साह टिकवून ठेवण्यासाठी प्रथिनांचे (Protein) सेवन करणे अत्यंत गरजेचे असते. शाकाहारी लोकांसाठी डाळी हा प्रथिनांचा सर्वात उत्तम आणि नैसर्गिक स्रोत मानला जातो. पण, कोणत्या डाळीत नेमके किती प्रथिने असतात आणि रोजच्या आहारात कोणत्या डाळीचा समावेश करावा, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग, सर्वाधिक प्रथिने असलेल्या डाळींची माहिती घेऊया.
कोणत्या डाळीत आहे सर्वाधिक प्रथिने?
- उडीद डाळ: उडीद डाळ प्रथिनांचा सर्वात मोठा खजिना मानली जाते. प्रति 100 ग्राम कच्च्या उडीद डाळीत सुमारे 25 ग्राम प्रथिने आढळतात. स्नायू मजबूत करण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी ही डाळ अत्यंत गुणकारी आहे.
- कुळीथ डाळ (हुलगे) : प्रथिनांच्या बाबतीत कुळीथ डाळ मागे नाही. 100 ग्राम कुळीथ डाळीत साधारण 22 ते 24 ग्राम प्रथिने असतात. प्रथिनंशिवाय यात फायबर, लोह आणि कॅल्शियमचे प्रमाणही भरपूर असते. वजन कमी करण्यासाठी आणि किडनी स्टोनच्या समस्येत ही डाळ औषधी ठरते.
- मूग आणि मसूर डाळ: या दोन्ही डाळी प्रथिनांनी समृद्ध तर आहेतच, पण त्या पचायला अत्यंत हलक्या असतात. आजारी व्यक्ती किंवा लहान मुलांसाठी या डाळींचे वरण उत्तम मानले जाते. रोजच्या आहारात यांचा समावेश करणे पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते.
- तुरीची डाळ: भारतीय घरांमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी तुरीची डाळ प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. यामध्ये सुमारे 20 ते 25 टक्के प्रथिने असतात. तसेच यात लोह, फॉलेट आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी ही डाळ उत्तम आहे.
डाळींचे सेवन कसे आणि किती करावे?
तज्ज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी रोजच्या जेवणात किमान एक वाटी डाळीचा समावेश असणे आवश्यक आहे. तुम्ही वेगवेगळ्या डाळी एकत्र करून ‘मिक्स डाळ’ देखील बनवू शकता, ज्यामुळे शरीराला विविध पोषक तत्वे मिळतात.










