Suraj Chavan Wedding Date : ‘बिग बॉस मराठी 5’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा सूरज चव्हाण लवकरच आयुष्याच्या नव्या टप्प्याची सुरुवात करत आहे. त्याने बिग बॉसच्या घरात आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले होते, ज्यामुळे त्याला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळाला. आता अखेर सूरज चव्हाणच्या लग्नाची उत्सुकता संपुष्टात आली आहे.
जेजूरी, सासवड येथे होणार विवाह
सूरज चव्हाण हा संजना हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांचा हा पारंपरिक विवाह सोहळा या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. पुण्याजवळील जेजूरी, सासवड या ठिकाणी हा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्य समारंभापूर्वीचे विधी 28 नोव्हेंबरपासून सुरू होतील, ज्यात हळद, मेहंदी आणि संगीत यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांचा समावेश आहे. या खास सोहळ्यासाठी सूरजच्या नवीन घराची सजावटही करण्यात येत आहे.
प्रेम कहाणीचा उलगडा
संजना नेमकी कोण आहे, याबद्दलची उत्सुकता सूरजच्या चाहत्यांना होती. याबद्दल ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिने एका मुलाखतीत खुलासा केला. संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. विशेष म्हणजे, त्यांचे हे लग्न अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात, असेही अंकिताने सांगितले.
अंकिताचा मोठा हातभार
बिग बॉसची स्पर्धक राहिलेल्या अंकिता वालावलकरने या जोडप्याला लग्नाच्या तयारीसाठी मोठी मदत केली आहे. तिने नुकतेच या दोघांचे ‘केळवण’ केले आणि त्यांना भेटवस्तूही दिल्या. तसेच, संजनाच्या साड्यांची निवड आणि सूरजच्या कपड्यांच्या शॉपिंगमध्येही तिने मदत केली. अंकिताने याबद्दलचा एक खास व्हिडीओ तिच्या चॅनलवरही शेअर केला आहे. मात्र, 29 नोव्हेंबर रोजी तिच्या कुटुंबात लग्न असल्यामुळे ती स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही.
हे देखील वाचा – देशातील सर्वात स्वस्त कारवर खास ऑफर! 52,100 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट; मिळेल 32KM मायलेज









